लहान मुलांना आपण तब्येतीसाठी चांगले म्हणून दूध पिण्याची सवय लावतो. पण काहीवेळा मुलांना नुसते दूध पिणे आवडत नाही. त्यात त्यांना वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या प्रोटीन पावडर घालून किंवा फ्लेवर्ड दूध प्यायला फार आवडते. अशावेळी आपण बाजारातून वेगवेगळ्या चवीच्या, विविध फ्लेवर्सच्या प्रोटीन पावडर विकत आणतो.
या फ्लेव्हर्स प्रोटीन पावडर महागड्या असतात शिवाय त्या बऱ्याच काळ टिकण्यासाठी त्यात विविध प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह्ज, भरपूर आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि गोड चवीसाठी असंख्य प्रमाणांत स्वीटनर्सचा समावेश केलेला असतो. त्यामुळे या विकतच्या प्रोटीन पावडर लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरु शकतात. मुलांना नुसते दूध पिणे पसंत नसेल तर आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात मुलांसाठी प्रोटीन पावडर तयार करू शकतो. यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहूयात(Try Homemade Milk Mix For Kids).
साहित्य :-
१. मखाणे - २ ते ३ कप
२. बदामाची पावडर - २ टेबलस्पून
३. कोको पावडर - २ टेबलस्पून
४. ब्राऊन साखर - ३ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम एक पॅन गरम करून त्यात मखाणे कोरडे भाजून घ्यावेत.
२. आता हे मखाणे थोडे गार झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी.
३. एका बाऊलमध्ये मखाण्याची बारीक झालेली पावडर घेऊन त्यात कोको पावडर, बदामाची पावडर, ब्राऊन साखर घालून हे मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून एकजीव करून घ्यावे.
४. आता ही तयार झालेली होम मेड प्रोटीन पावडर एका हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावी.
५. मुलांना नुसते दूध पिणे आवडत नसल्यास एक ग्लास दुधात एक चमचा होम मेड प्रोटीन पावडर घालून दूध प्यायला द्यावे.
होम मेड प्रोटीन पावडरचे फायदे :-
१. होम मेड प्रोटीन पावडर मुलांना दिल्याने त्यांची पचनक्रिया आणि त्वचेचे आरोग्यही चांगले राहील.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त.
३. मुलांना ताकद व स्नायूंना बळकटी देण्यासाठी होम मेड प्रोटीन पावडरचा एनर्जी बुस्टींग म्हणून वापर करू शकता.