- स्मिता दामले
कोकण काय किंवा इतर ग्रामीण भागात काय ऋतूनुसार आहार ठरतो. त्यात मुख्यत्वे स्थानिक आणि मौसमी धान्य, भाज्या, फळं यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कोकणात कुळथाचं पिठलं फार प्रिय. देशावर याच कुळथाच्या पिठाचे शेंगोळे आवडते. खांदेशात या शेंगोळ्यांना-मुटकुळ्यांनाच जिलबी म्हणायचीही पद्धत आहे. कुळीथ आता नव्या काळात सुपरफूड म्हणून गाजते आहे. वजन कमी करण्याच्या न्यूट्रिशियस डाएटमध्ये कुळथाचा वापर सुचवला जातो. (horse gram recipes) आपल्या पारंपरिक आहारात हे पदार्थ आहेतच.कोकणात खासकरून थंडीच्या दिवसात कुळीथ भिजवून मोड आणून त्याची उसळ आणि कढण हे दोन हमखास केले जाणारे पदार्थ आहेत.अतिशय गुणकारी, भरपूर लोह असलेलं हे उष्ण कडधान्य.मात्र कुळथाचे कढण अतिशय चविष्ट लागते. आणि आजारी माणसांसाठी अत्यंत उपयोगी गुणकारी असते.
(Image : Google)
कुळथाची उसळकुळीथ सकाळी भिजत घालून रात्री उपसुन ठेवावेत. भरपूर मोड़ आले की (थंडी च्या दिवसात जरा जास्त वेळ लागतो मोड यायला) कुळथामधे जरा जास्त पाणी व् हळद हींग थोडं मीठ घालून शिजवावे. चार पाच शिट्ट्या करुन गॅस बारीक़ करुन ठेवला की छान शिज़तात कुळीथ.नंतर त्यातील जास्तीचे पाणी वेगळे काढून ठेवावे आणि जरा जास्त तेलाची फोडणी करुन उसळ घालावी.लाल तिखट, गोंडा मसाला, थोडा गरम मसाला, गुळ, मीठ आणि थोडा ओला नारळ घालून मिक्स करुन घ्यावे.उसळ झाली की परत वरुन ओला नारळ आणि कोथिंबीर भरपूर घालावं.ही झाली उसळ तयार.
कुळथ उसळ- मालवणीओला नारळ, आलं, भरपूर लसुण, काळी मिरी, कांदा उभा चिरून थोड्या तेलात खरपूस भाजुन, हळद, हींग, लाल तिखट, काळा मसाला मालवणी मसाला असं सगळं वाटून हे मिश्रण तेलावर खमंग परतवून घ्यावे.नंतर त्यात शिजलेले कुळीथ, थोडा गुळ, मीठ सगळं घालून थोड़ उकळी येऊ द्यायची. चविष्ट उसळ तय्यार.उसळ किती पातळ किँवा सरसरित करायची ते आपल्या आवडीनुसार ठरवता येते.
(Image : Google)
कुळथाचे कढणउसळ शिजवून वेगळ्या काढलेल्या पाण्यामधे थोड़ं ताक, थोड़ी साखर, मीठ, परत किंचित हळद, हिंग, किंचित लाल तिखट घालावं, थोडी मिरी पावडर घालावी आणि वरुन अगदी थोड़ं साजुक तूप आणि तेल अशी मिक्स फोडणी करावी चव चांगली येते. फोडणी ऑप्शनल आहेप्यायला देताना हे कढण थोडं गरम करून, गाळून प्यायला द्यावं.आजारी माणसासाठी गुणकारी अगदी उत्तम.जर कफ विकार असतील तर ताक घालू नये.आताच्या कोरोनाकाळात अशी कढणं ही अत्यंत उपयुक्त आहेत. थंडीत गरमागरम प्यायलाही उत्तम. आणि वजन कमी करण्यासाठी सूप पीत असाल तर हा कढण पर्याय अत्यंत सकस.करुन पहा.