थंडीचा सिझन म्हटला की आपल्याला काहीतरी गरमागरम प्यावेसे वाटते. बाहेर गारठा असताना शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपण गरम चहा-कॉफी घेत राहतो. पण त्याने शरीराला म्हणावा तितका फायदा होतोच असे नाही. अशावेळी शरीराला ताकद मिळेल, पोषण मिळेल असे काही डाएटमध्ये समाविष्ट केल्यास त्याने निश्चितच तब्येत चांगली राहण्यास मदत होते. हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशावेळी या भाज्यांचे गरमागरम सूप केल्यास ते तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. इतकेच नाही तर हे सूप झटपट होणारे असल्याने फारसा वेळही जात नाही. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर असणारे हे भाज्यांचे सूप करण्याची सोपी रेसिपी, पाहूया (Mix Veg Soup Healthy and Easy Recipe)...
साहित्य -
१. फ्लॉवर - कोबी - १ वाटी
२. फरसबी - १ वाटी
३. हिरवा किंवा लाल भोपळा - १ वाटी
४. टोमॅटो - १
५. बीट - गाजर - १ वाटी
६. कॉर्न फ्लोअर - २ चमचे
७. मीरपूड - पाव चमचा
८. मीठ - चवीपुरते
९. आलं-लसूण पेस्ट - अर्धा चमचा
१०. तेल - अर्धा चमचा
कृती -
१. घरात उपलब्ध असतील त्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्यायच्या.
२. या भाज्या कुकरच्या भांड्यात घालून त्यात पाणी घालून २ शिट्ट्या काढून घ्यायच्या.
३. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून आलं-लसूण पेस्ट घालावी आणि ती थोडी लालसर होऊ द्यावी.
४. यामध्ये शिजलेल्या भाज्या पाण्यासहीत घालाव्यात.
५. एका वाटीत कॉर्न फ्लोअर घेऊन त्यात पाणी घालून ते चांगले मिसळून घ्यावे आणि कढईत घालावे. यामुळे घट्टपणा येण्यास मदत होते.
६. सूप चांगले शिजत आले की त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालावी. चांगले उकळल्यानंतर गरमागरम सूप पिण्यास तयार होते.
७. भाज्या कुकरमध्ये आणि पुन्हा कढईमध्ये शिजल्याने चांगल्या मऊ होतात. पण लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना द्यायचे असल्यास हे सगळे झाल्यावर सूप मिक्सरमधून काढून बारीक करुन घेतले तरी चालते.