मेघना सामंत
हिमालयाच्या कुशीतल्या कुठल्याही हिलस्टेशनला जा, हमखास मिळतो तो मोमो. संपूर्ण उत्तर भारतात आणि दिल्ली कोलकाता अशा महानगरांत सध्याच्या काळातलं हे सर्वाधिक खपाचं स्ट्रीट फूड. एक प्लेट वाफाळते मोमोज् जहाल चटणीसोबत गपागप मटकावले की आतून जी काही उबदार वाटायला सुरुवात होते...आहा ! मग दुसऱ्या प्लेटचा मोह आवरत नाही...मोमो नेपाळचा राष्ट्रीय पदार्थ. तिथूनच तो भारतात आला हे साऱ्यांना ठाऊक असतं. तिथे मात्र तो फार फार खडतर यात्रा करून आला आहे, पार तिबेटमधून.
नेपाळमधला नेवारी हा समाज व्यापाराच्या निमित्ताने तिबेटच्या वाऱ्या करत असे. सतराव्या शतकातला तो प्रवास... रस्ते असे नव्हतेच, अजस्र पर्वतरांगांमधल्या खिंडींमधून, भीषण थंडी आणि हिमवादळांना तोंड देत नेपाळची राजधानी काठमांडू ते तिबेटची राजधानी ल्हासा असं सहासातशे किलोमीटरचं अंतर पायी कापायला सत्तर-पंच्याहत्तर दिवस लागत. ल्हासाला पोचल्यावर व्यापारातल्या नफ्याने त्यांचा श्रमपरिहार होत असेल कदाचित, पण घरगुती अन्नाची वानवा होती. सहासहा महिने घराच्या बाहेर काढावे लागलेल्या कित्येक व्यापाऱ्यांनी ल्हासामध्ये दुसरे संसारही थाटले. तिथल्या गृहिणींच्या हातचा एक प्रकार त्यांना बराच आवडला- वेगवेगळी सारणं पिठाच्या पारीत भरून, पुरचुंड्या करून वाफवून काढलेल्या- त्यांचं नाव मॉग मॉग… ही साधीसोपी कृती त्यांनी आपल्यासोबत नेली; प्रसृत केली. नेवारी समुदायाने नेपाळला दिलेली ही देणगी. मॉग मॉगचं नाव मग लाडाने मोमो एवढंच राहिलं. नेवारी बोलीत 'मोम'चा अर्थ वाफवणे असा असल्याचंही सांगतात.
(छायाचित्र -गुगल)
नेपाळमधून रोजगारार्थ बाहेर पडणाऱ्यांसोबत मोमो भारतात आला. तरीही तेव्हा तो तितकासा परिचित नव्हता. पुढे १९५९मध्ये दलाई लामांनी भारतात आश्रय घेतला, तेव्हापासून तिबेटी निर्वासितांच्या छावण्या अनेक ठिकाणी वसवल्या गेल्या. तिथल्या चुलींवर मोमो वाफवण्याची भांडी चढली. भराभर तयार होणारे मोमोज् छावण्यांमधल्या आबालवृद्धांची भूक भागवू लागले. हे मोमोजचं भारतातलं दुसरं आणि दमदार आगमन. स्वस्तातलं, गरमागरम, पोटभरीचं खाणं म्हणून त्यांची लोकप्रियता वाढली. हळूहळू चायनीज पदार्थांसारखेच गल्लोगल्ली मोमोजचे ठेले लागू लागले. भरपूर तेलात तळलेल्या स्नॅक्सची चलती असलेल्या उत्तर भारतात, निव्वळ वाफवलेल्या मोमोचं यश लक्षणीय म्हणायला हवं. दुसरीकडे जगभरातच आशियाई पदार्थांची क्रेझ वाढत चाललेली. पंचतारांकित हॉटेल्स आणि फाइन डाइन रेस्टॉरंट्सच्या टेबलवरही देखणी नाजूक मुरड घातलेले सुबकसे मोमोज् विराजमान झाले. कधी त्यांचं नाव डिम-सम असतं तर कधी डम्पलिंग्स एवढाच फरक.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)