Join us  

विकेंडला घरीच ट्राय करा हॉटेल स्टाईल पनीर हैद्राबादी, चमचमीत रेसिपी, जेवण होईल मस्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 11:13 AM

Hotel style paneer Hayderabadi vegetable Recipe : हॉटेलसारख्याच भाज्या आपण घरी केल्या तर त्या होतातही भरपूर आणि विशेष खर्चही येत नाही.

घरी आपल्याला सतत त्याच त्या फळभाज्या, पालेभाज्या, कोशिंबीरी आणि आमटी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी आपण विकेंडला किंवा एरवीही हॉटेल गाठतो. मग हॉटेलमध्ये आपण ग्रेव्ही असलेली पंजाबी डीशमधील चमचमीत भाजी ऑर्डर करतो. यामध्ये भरपूर बटर, मसाले असल्याने या भाज्या आपल्याला आवडतात. पण एकतर हॉटेलमध्ये गेल्याने खूप पैसे तर जातातच आणि त्यामध्ये वापरलेल्या गोष्टी कितपत चांगल्या असतात हेही आपल्याला माहित नसते. त्यापेक्षा हॉटेलसारख्याच भाज्या आपण घरी केल्या तर त्या होतातही भरपूर आणि विशेष खर्चही येत नाही. हॉटेलमध्ये आवर्जून ऑर्डर केली जाणारी थोडी स्पायसी तरीही अतिशय चविष्ट अशी भाजी म्हणजे पनीर हैद्राबादी. घरच्या घरी ही भाजी हॉटेल स्टाईल होण्यासाठी नेमके काय करायचे पाहूया (Hotel style paneer Hayderabadi vegetable Recipe)... 

१. पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये साधारण पाव किलो पनीरचे थोडे लांबसर तुकडे करुन ते फ्राय करुन घ्यायचे.  

२. मग हे पनीर काढून घेऊन त्याच तेलात कांदा, लसूण, मिरची आणि आलं परतून घ्यायचं. 

(Image : Google)

३. कांदा, लसूण थोडं परतून झालं की त्यामध्ये कोथिंबीर, थोडी पालकाची पानं आणि पुदीन्याची पानं स्वच्छ धुवून ती परतून घ्यायची. 

४. हे सगळे चांगले लालसर परतून झाल्यावर थोडे गार होऊ द्यायचे आणि मग मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून त्याची चांगली पेस्ट करुन घ्यायची. 

५. पुन्हा गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालायचे आणि त्यात जीरे, दालचिनी, लवंग, लाल मिरची, वेलची, काळी वेलची, हे सगळे घालून चांगले परतायचे. 

६. यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली ग्रेव्ही घालायची आणि तिला तेल सुटेपर्यंत चांगली परतून, शिजवून घ्यायची. 

७. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यामध्ये गरम मसाला, धणेजीरे पावडर, हळद, तिखट, मिरपूड आणि मीठ घालून सगळे चांगले एकजीव करायचे.

८.  गॅसवर शिजणाऱ्या ग्रेव्हीमध्ये थोडे पाणी घालून यात दह्याचे मिश्रण घालायचे आणि सगळे चांगले एकजीव करुन परतून घ्यायचे. 

९. मग यामध्ये थोडं गरम पाणी आणि फ्रेश क्रिम घालून ही ग्रेव्ही पुन्हा एकदा चांगली हलवून घ्यायची. 

१०. मग यामध्ये तळलेले पनीरचे काप टाकायचे आणि २ मिनीटांसाठी वाफ काढायची आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

११. ही भाजी फुलके, पोळ्या, पुऱ्या, रोटी, जीरा राईस कशासोबतही अतिशय छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.