हिवाळ्याच्या दिवसांत आपल्याला सतत गरमागरम काहीतरी खावेसे नाहीतर प्यावेसे वाटते. एकतर थंडीच्या दिवसांत भूकही वाढलेली असल्याने नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात. गरम म्हटलं की चहा किंवा कॉफी घेतली जाते. पण त्यापेक्षा सूपचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले तर शरीराला पोषणही मिळते आणि घशालाही आराम मिळतो. थंडीत अनेकांना सर्दी, खोकला किंवा घसादुखी अशा समस्या उद्भवतात. मंचाव सूपमध्ये आलं-लसूण जास्त प्रमाणात असल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच यामध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलं भाज्या खात नसतील तर या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जाण्यासही मदत होते (Hotel Style Veg Manchow Soup recipe).
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हे एक सूप १५० ते २०० रुपयांना घेतो. यामध्ये कितपत फ्रेश गोष्टी वापरलेल्या असतात हेही आपल्याला माहित नसते. पण घरीच हॉटेलसारखे सूप तयार केल्यास ते कमीत कमी खर्चात भरपूर तर होतेच पण स्वच्छता आणि भाज्यांचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते. हे सूप प्यायल्यावर पोटात जास्त जागा नसल्याने भाताचा एखादा प्रकार केला तरी पुरे होतो. त्यामुळे विकेंडला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि सतत तेच ते खाऊन बोअर झाले असेल तर तुम्ही हे सूप करण्याचा नक्कीच प्रयत्न करु शकता.
साहित्य -
१. मशरुम - अर्धी वाटी
२. बेबी कॉर्न - अर्धी वाटी
३. कोबी - पाव वाटी
४. बिन्स - पाव वाटी
५. मिरची - १
६. मिरपूड - पाव चमचा
७. सोया सॉस - २ चमचे
८. चिली सॉस - २ चमचे
९. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
१०. लिंबाचा रस - १ चमचा
११. मीठ - चवीपुरते
१२. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे
१३. कांद्याची पात - अर्धी वाटी
१४. तेल - २ चमचे
कृती -
१. कढईत तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची.
२. यामध्ये सगळया भाज्या घालून त्या किमान ५ मिनीटे परतून घ्यायच्या.
३. यामध्ये पाणी घालून मग मीरपूड, सोया सॉस, चिली सॉस घालायचा.
४. कॉर्न फ्लोअरमध्ये पाणी घालून ते या मिश्रणात घालायचे, सूप दाटसर होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
५. मीठ, लिंबाचा रस आणि मिरची घालायची.
६. या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग गरमागरम सूप प्यायला घ्यायचे.
७. बाजारात मिळणाऱ्या नूडल्स तळून या सूपमध्ये घालून खायला छान लागतात.