घरात गरमागरम खिचडीसोबत किंवा एखादी कंटाळवाणी, नावडती भाजी असेल तर आपण आवर्जून सोबत तोंडी लावायला पापड घेतो. उडदाचा पापड अनेक घरांमध्ये नियमीत आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. कधी मसाला पापड तर कधी मूगाच्या कोशिंबीरीत किंवा पोह्याच्या चिवड्यातही पापड घालून खाल्ला जातो. पापडामुळे जेवणाला छान चव येते आणि कदाचित ४ घास जास्तच खाल्ले जातात. हॉटेलमध्येही अनेकदा आपण पुढची ऑर्डर ठरवेपर्यंत टाइमपास म्हणून मसाला पापड ऑर्डर करतो. पूर्वी घरोघरी किलोकिलोने केले जाणारे उडदाचे पापड आता बाजारातही सहज मिळत असल्याने सर्रास तळून किंवा भाजून खाल्ले जातात. मात्र हा पापड आरोग्यासाठी कितपत चांगला असतो याचा आपण पुरेसा विचार केलेला असतोच असे नाही. तर वजनाला हलका वाटणारा पापड पचायला मात्र जास्त जड असतो याबाबत आपल्याला माहिती नसते (How About Digestion of Udid Papad Diet Tips).
पापड पचायला जड का असतो?
मुळात पापडात टाकला जाणारा पापडखार हा पापडाला जड करतो. त्यामुळे ज्यांना ह्रदय, किडनी किंवा ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी पापड खाणे टाळावे. ज्यांना जास्त अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही पापडापासून दूरच राहायला हवे. पापडामध्ये फायबर नसल्याने त्याचे पचन होताना आतड्यांवर ताण येतो. यामध्ये आतड्यांचा आजार किंवा अॅसिड रिप्लेक्स यांसारख्या तक्रारी निर्माण होतात. यामुळे आतड्यांची पाचनक्षमता कमी होण्याची शक्यता असते. तसेच पापडांमुळे इतर खाद्यपदार्थ पचनासही अडथळा निर्माण होतो. त्याने पोटाचे विकार वाढण्याची शक्यता असते.
आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात...
इतर डाळीच्या तुलनेत उडीद डाळ ही पचवायला जड असते. त्यामुळे इतर कुठल्याही डाळींमधील प्रोटिन्सपेक्षा उडदाच्या डाळीमध्ये असणारे प्रोटिन्स तुलनेने उशीरा पचतात. शरीराला प्रोटिन्समधून अमिनो अॅसिडस वेगळे काढायचे असतात. ही प्रक्रिया कोणत्याही पदार्थातील प्रोटिन्समधल्या अमिनो अॅसिडचा क्रम आणि प्रमाण ह्यावर अवलंबून असते. उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला नक्कीच हानिकारक असतो कारण त्यात असलेले सोडियमचे अतिरिक्त प्रमाण शिवाय तळताना तयार होणारे acrylamide. साधारणपणे कोणत्याही पदार्थाचे पचन होण्यासाठी शरीराला 24 ते 72 तासाचा कालावधी लागतो. ही गती पूर्णपणे त्या त्या व्यक्तीची पचनसंस्था कशी आहे ह्यावर अवलंबून असते. कुठलाही पदार्थ पचतो म्हणजे मुख ते गुदद्वारापर्यंत त्याचा झालेला प्रवास होय. आतड्याच्या क्षमतेनुसार त्या पदार्थाचे पचन होत असते.