Join us  

लोणचे खराब होऊ नये आणि वर्षभर टिकावे म्हणून ५ सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 5:17 PM

How To Preserve Pickle Longer : लोणचं निगूतीने घातलं तरी त्याला बुरशी लागते, लोणचं उत्तम मुरावं म्हणून या टिप्स

भारतीय जेवणात मुख्य पदार्थांसोबत तोंडी लावायला म्हणून अनेक पदार्थ ताटात असतात. खरंतर हे तोंडी लावायचे पदार्थच आपल्या मुख्य जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. भारतीय जेवणात तोंडी लावायला म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कोशिंबीर, भरलेली मिरची, लोणचं, पापड, कुरडया, सांडगे असे अनेक पदार्थ असतात. तोंडी लावायला म्हणून घेतलेल्या या पदार्थांशिवाय आपले जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. रोजच्या जेवणाची रंगत अजूनच वाढवण्यासाठी आपण काही पदार्थ आवर्जून ताटात वाढून घेतो.  

 जेवणातील तोंडी लावायचा एक खास पदार्थ म्हणजेच लोणचं. लोणचं हे कशाचेही बनवता येते. अगदी आंब्यापासून ते भाज्यांपर्यंत सगळयांचं पदार्थांचे उत्तमरित्या चविष्ट लोणचं बनवता येते. लोणचे हे कैरीचे, मिरचीचे, लिंबाचे, तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, लसणाचे, गाजराचे आदी फळांचे असू शकते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. लोणच्याचा स्वाद एकदम चटपटीत असतो आणि आहाराची चव देखील झटक्यात वाढवतो. लोणच्यामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो ज्यामुळे लोणच्याची चव अधिक चविष्ट असते. आंब्याचे लोणचे उन्हाळ्यात भरपूर घरांमध्ये बनवले जाते. लोणचे भारतीय पदार्थांना मोहिनी घालण्याचे काम करते. यामुळेच आपल्याला जवळपास प्रत्येक घरात आंब्याचे लोणचे नक्कीच सापडेल. उन्हाळा म्हटलं की वर्षभरासाठी पुरेल इतके लोणचं, पापड, कुरडया आपण सगळेच बनवतो. आपण कित्येकवेळा लोणचे बनवून ते वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो परंतु काहीवेळा हे लोणचे योग्य पद्धतीने स्टोअर न झाल्यामुळे लगेच खराब होते. यासाठी आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत जेणेकरून लोणचे लगेच खराब होणार नाही(How do I keep my mango pickles fresh for a long time without adding any preservatives).

लोणचे लगेच खराब होऊ नये म्हणून काही टिप्स :- 

१. कच्चा आंबा निवडणे :- जर आपल्याला लोणचे जास्त काळ ताजे ठेवायचे असेल तर प्रथम आपल्याला योग्य कच्चा आंबा निवडावा लागेल. आंबा कच्चा आणि कडक असणे खूप महत्वाचे आहे. थोडासा पिकलेला आंबाही तुमच्या लोणच्याची चव खराब करू शकतो. म्हणूनच आंबा खरेदी करताना तो कच्चा आहे हे तपासूनच मग आंबा खरेदी करावा. 

२. कंटेनर निवडणे :- आंब्याचे लोणचे बनवल्यानंतर ते स्टोअर करून ठेवण्यासाठी चिनीमातीचे भांडे सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्हाला चिनीमातीच्या  भांड्यात लोणचे ठेवायचे नसेल तर तुम्ही ते काचेच्या भांड्यात किंवा डब्यात ठेवू शकता. लोणचे प्लॅस्टिकच्या डब्यात कधीही ठेवू नये, कारण त्यामुळे लोणचे  खराब होण्याचा धोका असतो. 

शिळा भात खायचा नाही, फोडणीच्या भाताचा कंटाळा आला? करा खमंग झटपट ‘भात वडा’!-चवीला जबरदस्त...

३. भांड्यांची स्वच्छता :- आंब्याचे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ते स्वच्छ असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याचे कारण असे की जर बरणी स्वच्छ नसेल तर त्यामध्ये बुरशी वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. यासाठीच बरणीत लोणचे ठेवण्यापूर्वी बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे, जेणेकरून ते स्वच्छ होईल.

रोजचं वरण होईल आता एकदम चविष्ट, घरीच करा खास पारंपरिक आमटी मसाला...

४. चांगल्या तेलाचा वापर :-  तुमचे लोणचे जास्त काळ टिकून राहावे असे वाटत असेल तर त्यात तेलाचा मोठा वाटा आहे. कैरीच्या लोणच्यामध्ये चव आणण्यासाठी तेल खूप महत्वाचे आहे. त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचे तेल निवडा. उत्तम दर्जाचे मोहरीचे तेल वापरणे हे उत्तम असते. लोणचे बराच काळ टिकण्यासाठी लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल घालावे. 

५. लोणचे काढण्याची पद्धत :- आपण कैरीचे लोणचे योग्य पद्धतीने स्टोअर करुन ठेवले आहेत. पण ते काढताना काळजी घेणे फार गरजेचे आहे. लोणचे जास्त दिवस टिकायचे असेल तर स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. अस्वच्छ चमच्याने किंवा हाताने लोणचे बाहेर काढणे टाळावे. लोणचे नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड ठिकाणी स्टोअर करून ठेवावे.      

टॅग्स :अन्न