Join us  

पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली घ्यायचीय पण तांबेच आहे की भलताच धातू? ४ टिप्स, तांब्याची बाटली ओळखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 4:12 PM

How To Identify An Original Copper Bottle : तांब्याची बाटली पाणी पिण्यासाठी चांगली पण आपण घेतोय ती तांब्याचीच बाटली हे कसं ओळखाल?

आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की, तांब्यांच्या धातूंपासून बनलेल्या भांड्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. आयुर्वेदातही या धातूंचा वापर अतिशय उपयुक्त मानला आहे. आजही अनेकजण तांब्यांच्या भांड्यातून पाणी पिण्यास प्राधान्य देतात. आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. सध्या कॉपर बॉटल म्हणजेच तांब्याची बॉटल खरेदी करण्याचा नवा ट्रेंड वाढला आहे. खरं तर तांब्याच्या बाटलीमधून पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, असं मानलं जातं.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, त्वचेचं तारूण्य टिकतं. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तांब्याची बॉटल खरेदी करताना तुम्ही प्युअर कॉपर म्हणजेच शुद्ध तांब्याची बॉटल खरेदी करत आहात ना?; ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक असतं. बाजारात अनेक तांब्याच्या बॉटल्स विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु त्यातून अस्सल तांब्यांच्या धातूंपासून बनविलेली बॉटल निवडणं कठिण असतं. अस्सल तांब्यांच्या धातूंपासून तयार झालेली बॉटल निवडण्यासाठी काही टिप्स लक्षांत ठेवू, ज्याच्या मदतीने आपण योग्य कॉपर बॉटल निवडू शकतो(How To Identify An Original Copper Bottle).

आपल्याकडील तांब्यांची बॉटल अस्सल तांब्यापासून बनली आहे की नाही हे कसे ओळखावे? 

१. खरेखुरे तांबे हे मॉइश्चरच्या संपर्कात आले की त्यावर ऑक्सिडाईज प्रक्रिया होऊन त्याचा रंग बदलतो. 

आपण बाजारातून तांब्याच्या बॉटल्स सहज विकत आणतो. परंतु हे तांबे खरे आहे की खोटे हे ओळखून मगच या धातूंच्या बाटल्या विकत घ्याव्यात. असं पहायला गेलं तर खरेखुरे तांबे हे मॉइश्चरच्या तसेच हवेच्या संपर्कात आले की त्यावर ऑक्सिडाईजची प्रक्रिया होऊन त्याचा रंग बदलतो. कित्येकदा आपण बाजारांतून नवीन विकत आणलेली तांब्याची बाटली आधी चकचकीत असते. कालांतराने ही बॉटल वापरुन व मॉइश्चरच्या तसेच हवेच्या संपर्कात येऊन त्यावर ऑक्सिडाईजची प्रक्रिया होण्यास सुरुवात होते. जेव्हा तांबे या धातूवर ऑक्सिडाईजची प्रक्रिया होते तेव्हा तांब्याच्या भांड्याचा रंग थोडासा काळपट होतो. आपल्याकडील तांब्याची बाटली वापरुन काही कालांतराने जेव्हा तिचा रंग बदलतो, ती थोडीशी काळपट होते तेव्हा समजावे की, हे तांबे खरेखुरे आहे. भेसळयुक्त नाही. आपल्याकडील तांब्याची बाटली नवीन विकत आणल्यानंतर बराच वेळ वापरूनही ती नव्यासारखी चकचकीत असेल तर हे तांबे भेसळयुक्त आहे असे समजावे.    

   

२. खऱ्याखुऱ्या तांब्याचा रंग हा धातूंपासून तयार झालेल्या नाण्यांच्या रांगांसारखाच असतो. 

 आपल्याकडील तांब्यांच्या बाटलीचा रंग हा ५ रुपयांचे किंवा १० रुपयांच्या नाण्यांशी मॅच होणारा असेल तर हे अस्सल तांबे आहे, असे समजावे. खऱ्याखुऱ्या तांब्याचा रंग हा धातूंपासून तयार झालेल्या नाण्यांच्या रांगांसारखाच असतो. तांब्याच्या बाटलीचा रंग या नाण्यांच्या रंगाशी मॅच होणारा नसेल किंवा अधिक चमचमता असेल तर हे तांबे अस्सल नाही किंवा भेसळयुक्त आहे असे समजावे. 

३. अस्सल तांब्यांची भांडी बराच काळ वापरल्याने काही कालांतराने त्यांवर हिरवा गंज चढतो. 

अस्सल तांब्यांची भांडी बराच काळ वापरल्याने त्यांवर एक प्रकारचा हिरवा गंज चढण्यास सुरुवात होते. आपल्याकडील तांब्यांच्या भांड्यांवर जर अशाप्रकारचा हिरवा गंज चढला असेल तर समजावे की हे तांबे खरेखुरे आहे, भेसळयुक्त नाही. तांब्यांची भांडी पुष्कळ काळ वापरल्याने त्या भांड्यांच्या पृष्ठभागांवर आलेली तकाकी, किंवा हिरव्या रंगाचा पातळसर गंज हे तांबे अस्सल असण्याच्या खुणा आहेत. 

४. खऱ्याखुऱ्या तांब्यांच्या धातूंमध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. (खरेखुरे तांबे नॉनमॅग्नेटिक असते)

खऱ्याखुऱ्या तांब्यांच्या धातूंमध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. खरेखुरे तांबे नॉनमॅग्नेटिक म्हणजेच ज्यात चुंबकिय गुणधर्म नसतात, असे असते. आपल्या घरी असलेली तांब्याची भांडी घेऊन त्यावर चुंबक चिटकविण्याचा प्रयत्न करावा. जर या तांब्यांच्या भांड्याला चुंबक चिकटले तर हे तांबे खरेखुरे नसून भेसळयुक्त तांबे असते. जर तांब्यांच्या भांड्याला चुंबक चिकटले नाही तर हे तांबे अस्सल तांबे आहे. अशाप्रकारे खरे तांबे आणि भेसळयुक्त तांबे यांतील फरक ओळखावा.

बाजारांतून तांब्याच्या बॉटल्सची खरेदी करण्याआधी काही खास टिप्स :- 

१. तांब्याची बॉटल खरेदी करताना त्यावरील बॉक्सवर लिहिलेली माहिती व्यवस्थित वाचा. जर त्यावर लिहिलेलं असेल की, तांब्यासोबत दुसरा एखादा धातू एकत्र केला गेला आहे, तर ती बॉटल खरेदी करू नका.

२. तांब्याची बॉटल तुम्ही दुकानातून खरेदी करा किंवा ऑनलाईन खरेदी करा. खरेदी करताना खोट्या विक्रेत्यांपासून दूर राहा.

३. अनेक तांब्याच्या बॉटल्समध्ये आतमध्ये काच किंवा दुसऱ्या धातूचा वापर करण्यात आलेला असतो. अशी बॉटल खरेदी करू नका. तांब्याची बॉटल पूर्णपणे तांब्यापासूनच तयर केलेली असाव. त्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नसावा.

४. आपण जी बॉटल खरेदी केली आहे ती तांब्याचीच आहे, हे ओळखण्यासाठी त्यावर लिंबू लावा आणि त्यानंतर धुवून टाका. त्याची शाइन तशीच राहिली तर ती तांब्याचीच आहे.

टॅग्स :अन्न