उन्हाळा सुरू झाला की बाजारात आवर्जून दिसणारी फळं म्हणजे कलिंगड आणि खरबूज. शरीराचे वाढलेले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. हे पाण्याचे प्रमाण चांगले ठेवण्यासाठी निसर्ग या काळात पाणीदार फळे देतो. भर उन्हात गारेगार खरबूज खाणे म्हणजे पर्वणीच. खरबूज खाल्ल्याने केवळ गार वाटते असे नाही तर या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. खरबूज खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणारे डिहायड्रेशन, लघवीला त्रास होणे, बद्धकोष्ठता हे त्रास खरबूज खाल्ल्याने कमी होतात.
खरबूजाच्या फोडी खाण्याबरोबरच खरबूजाचा ज्यूस पिणेही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हल्ली अनेकदा कच्ची फळे बाजारात विक्रीसाठी आणली जातात, आपल्याला ती नेमकी कशी ओळखायची माहित नसल्याने आपणही पैसे देऊन ती विकत घेतो पण घरी आणून कापल्यावर ते फळ आतून कच्चे असल्याचे समजते. आतमध्ये पांढऱ्या रंगाचे कडक फळ असेल तर ते खायला गोड तर लागत नाहीच पण त्यातून शरीराला काहीच मिळत नाही. अशावेळी फळ तर वाया जातेच पण आपले पैसेही वाया जातात. त्यामुळे बाजारात खरबूज आणायला गेल्यावर ते गोड असेल का हे कसे ओळखायचे? हे समजून घेऊया...
१. खरबूजाच्या वासावरुन ते पिकलेले आहे की नाही किंवा गोड आहे की नाही आपल्याला ओळखता येऊ शकते. त्यामुळे फळ खरेदी करताना त्याचा वास घेऊन बघणे हा उत्तम उपाय असू शकतो. पिकलेल्या खरबूजाला गोडसर वास येतो. मात्र वास येत नसेल तर ते खरबूज कच्चे असते.
२. फळ पिकले आहे की नाही हे ओळखण्याची सगळ्यात सोपी पायरी म्हणजे खरबूजाला अनेकदा देठ किंवा पानेही असतात. हे देठ पूर्णपणे वाळलेले असेल तर फळ पिकून तयार झाले आहे हे ओळखावे. मात्र हे देठ किंवा त्याला असलेली पाने ओलसर असतील तर फळ आतून पूर्ण तयार झाले नाही असे समजावे.
३. खरबूजाचा रंग चांगला आबोली, गुलाबीसर असेल तर ते फळ पिकलेले आहे किंवा येत्या दोन ते तीन दिवसांत पिकेल असे ओळखावे. मात्र खरबूजाचा रंग पूर्ण पांढरा किंवा हिरवट असेल तर हे फळ तयार व्हायच्या आधीच वेलीवरुन काढले आहे हे ओळखावे. त्यामुळे हे फळ तयार व्हायला एकतर बराच वेळ लागतो. किंवा ते तयार झाले तरी आधीच काढल्याने ते पूर्ण पिकतच नाही.
४. खखरबूज कलिंगडापेक्षा तुलनेने थोडे मऊ असते. त्यामुळे हाताने थोडे दाबून बघितल्यावर खरबूज दाबले जात असेल तर हे फळ पिकलेले असून गोड आहे असे लक्षात घ्यावे. पण बाहेरुन फळ खूपच कडक लागत असेल तर फळ पिकायला वेळ लागणार असून ते गोड आहे की नाही सांगता येत नाही.