बाजारात, दुकानांमध्ये विविध पदार्थ , गोष्टी उपलब्ध असतात. आपण वस्तू घेताना किंमत, ब्रॅण्ड वगैरे तपासून ती घेतो. अनेकदा खाद्यपदार्थांच्या बाबतीत आपली निवड फसलेली लक्षात येते. भेसळयुक्त वस्तू मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येत. खाद्यपदार्थात, सौंदर्यसंबंधित उत्पादनात छोट्यातल्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यत भेसळ होण्याची शक्यता असते. ही शक्यता खोबरेल तेलाच्या बाबतीतही असते. दक्षिण भारतीय ,कोकणी पदार्थ करताना स्वयंपाकात प्रामुख्याने खोबरेल तेलाचा वापर केला जातो. तसेच सौंदर्यासाठीही खोबरेल तेल गरजेचं असतं. हे तेल जर भेसळयुक्त असेल तर त्याचा आरोग्यावर , त्वचेवर, केसांवर दुष्परिणाम दिसून येतात. ह टाळायचे तर मग शुध्द खोबरेल तेलच वापरायला हवं. आपण आणलेलं खोबरेल तेल शुध्द आहे का , ते भेसळयुक्त नाही ना हे ओळखण्याच्या सोप्या पध्दती आहेत. त्या समजून घेतल्या आणि वापरुन पाहिल्या तर खोबरेल तेलबाबतच्या फसवणुकीचा, भेसळयुक्त खोबरेल तेल वापरण्याचा धोका नक्की टळेल.
Image: Google
खोबरेल तेल शुध्द की भेसळयुक्त?
1. खोबऱ्याचं तेल हे थंडीत गोठतं, घट्ट होतं हे सगळ्यांनाच माहीती आहे. त्यामुळे खोबऱ्याची शुध्दता तपासण्याची फ्रिझिंग टेस्ट काही मिनिटात आपल्याला खोबरेल तेल हे प्युअर की भेसळयुक्त याचा निकाल मिळतो. यासाठी विकत आणलेलं खोबरेल तेल एका काचेच्या ग्लासमध्ये काढावं. आणि ते थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवावं. काही मिनिटात जर ते घट्ट झालं, गोठलं की समजायचं हे शुध्द तेल आहे. तेल फ्रिजमध्ये ठेवूनही पातळच राहिलं तर मात्र ते भेसळयुक्त आहे हे समजावं आणि अशा तेलाचा वापर टाळावा.
2. खोबरेल तेलाची शुध्दता आणि भेसळ ही चवीवरुन ओळखा येते. विकत आणलेल्या तेलाची चव घेऊन पाहावी. ती जर विचित्र वाटली किंवा तेलाचा गंध वेगळा वाटला तर असं तेल भेसळयुक्त आहे हे समजावं.
Image: Google
3.चव आणि गंधासोबतच रंग चाचणी करुनही खोबरेल तेलाबाबातच्या शुध्दतेची खात्री करता येते. खोबरेल तेल जेव्हा गोठतं तेव्हा त्याचा रंग पांढरा किंवा पिवळसर असतो. पण जर गोठलेल्या खोबरेल तेलाचा रंग धूरकट किंवा काही वेगळाच असला तर मात्र हे तेल खात्रीनं भेसळयुक्त आहे हे समजावं.
4. गोठलेलं खोबरेल तेल जेव्हा पातळ करतो तेव्हा पातळ खोबरेल तेल हे नितळ कधीच दिसत नाही. ते तर नितळ आणि पारदर्शक दिसत असेल तर ते शुध्द खोबरेल तेल नसतं हे नक्की.
Image: Google
हेही महत्त्वाचे!
* खोबरेल तेल सुट्टं घेतलं तर ते शुध्द मिळतं हा गैरसमज आहे. पॅकबंद स्वरुपात मिळणाऱ्या खोबरेल तेलात सुट्या खोबरेल तेलाच्या तुलनेत भेसळ करणं अवघड असतं. त्यामुळे सुट्या तेलाऐवजी पॅकबंद खोबरेल तेल घ्यावं असं तज्ज्ञ सांगतात.
* पॅकबंद खोबरेल तेल विकत घेताना बाटली किंवा पॅकेटवरचा ' एफएसएसएआय'चा शिक्का आहे का ते पाहावं हा शिक्का आतील पदार्थ/ उत्पादनाच्या शुध्दतेची खात्री असते तेव्हाच दिला जातो.एफएसएसएआय शिक्का नसेल तर ते विकत घेऊ नये.