दही किंवा ताक शरीरासाठी उत्तम आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. त्यामुळे उन्हाळ्यातील आहारात ताकाचा आवर्जून समावेश केला जातो. दह्यात भरपूर पाणी टाकून घुसळून ताक केलं जातं. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. ताकामध्ये अनेक महत्वाची पोषकतत्वे, खनिजे, व्हिटॅमिन्स असतात. ताक हे चविष्टय, पौष्टिक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा अतिशय उपयुक्त असते. आजकाल जेवणाच्या काही पारंपरिक पदार्थांना इतर फ्लेवर्ड किंवा दम देऊन त्यांचे नवीन रूप तयार केले जाते. कोळश्याचा दम दिल्याने पदार्थांची चव अधिकच वाढते. दम बिर्याणी, दम चहा, दम पुलाव असे विविध पदार्थ आपण आजवर खाल्ले असतील. ताकात पण आपण वेगवेगळ्या फ्लेव्हर्डचे ताक पितो. स्मोक्ड ताक हा ताकाचा नवीन फ्लेवर्ड नक्की ट्राय करून पाहा. स्मोक्ड ताक कसे बनवायचे याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(How To Make Smoked Flavored Buttermilk).
साहित्य -
१. पुदिन्याची पाने - ३ टेबलस्पून
२. कोथिंबीर - ३ टेबलस्पून
३. हिरची मिरची - १ (बिया काढून घेतलेली)
४. जिरे पावडर - १ टेबलस्पून
५. ब्लॅक सॉल्ट - १/४ टेबलस्पून
६. ब्लॅक सॉल्ट - १ कप
७. पाणी - २ कप
स्मोक्ड फ्लेवर्ड देण्यासाठीचे साहित्य -
१. कोळश्याचा तुकडा - १ खडा
२. तूप - १ टेबलस्पून
burrpet_या इंस्टाग्राम पेजवरून स्मोक्ड ताक कसे बनवायचे, याचे साहित्य व कृती काय आहे याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कृती -
१. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरची मिरची, जिरे पावडर, ब्लॅक सॉल्ट आणि किंचित पाणी घालून त्याची थोडी पातळसर पेस्ट करून घ्या.
२. आता एका भांड्यात दही आणि पाणी घालून आपण जसे नॉर्मल ताक बनवतो तसे बनवून घ्या.
३. हे ताक बनवून झाल्यावर यात आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी पेस्ट १ टेबलस्पून घालावी. ही पेस्ट त्या ताकामध्ये घालून ताक व्यवस्थित चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे.
४. आता एक कोळश्याच्या तुकडा गॅसवर गरम करून घ्यावा.
५. अॅल्युमिनियम फॉईलचा एक छोटा तुकडा घेऊन त्याला गोलाकार वाटीसारखा आकार देऊन तयार करून घेतलेल्या ताकामध्ये ठेवावा. या अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गॅसवर गरम करून घेतलेला कोळश्याचा तुकडा ठेवावा.
६. आता या गरम कोळश्याच्या तुकड्यावर १ टेबलस्पून तूप सोडून लगेच त्यावर झाकण ठेवावे.
७. असे केल्याने कोळश्याच्या दमचा फ्लेवर्ड त्या ताकामध्ये उतरेल.
८. ५ ते १० मिनिटांनंतर ताकावरील झाकण काढून चमच्याच्या मदतीने हे ताक ढवळून घ्या.
९. सर्व्हिंग ग्लासमध्ये हे ताक सर्व्ह करावे आवडीनुसार बर्फाचा खडा घालावा.
स्मोक्ड फ्लेवर्ड ताक पिण्यासाठी तयार आहे.