Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे. चाकवताच्या भाजीतील गुणधर्म आणि पोषक तत्त्वांमुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ चाकवताची भाजी हिवाळ्यात खाण्याचा सल्ला देतात. चाकवताच्या भाजीला इतकं महत्त्वं का? चाकवताच्या चविष्ट पाककृती कोणत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 03:10 PM2021-12-04T15:10:03+5:302021-12-04T15:27:41+5:30

सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे. चाकवताच्या भाजीतील गुणधर्म आणि पोषक तत्त्वांमुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ चाकवताची भाजी हिवाळ्यात खाण्याचा सल्ला देतात. चाकवताच्या भाजीला इतकं महत्त्वं का? चाकवताच्या चविष्ट पाककृती कोणत्या?

How to include healthy bathua in diet for 7 health benefits ! 3 Tasty and Easy recipes of Bathua | हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! करा भाजी-कढी-पराठे, 7 पोषक फायदे

Highlights शरीरातील पेशींपासून चेहर्‍याचं सौंदर्य वाढवण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठीही चाकवत आहारात गरजेचीच. चाकवताच्या भाजीत रक्त शुध्द करणारे घटक असतात. रक्त शुध्दीसाठी ही भाजी किमान आठवड्यातून दोनदा तरी खायला हवी. वजन कमी करण्यासाठी चाकवताची भाजी महत्त्वाची मानली जाते. कारण 100 ग्रॅम चाकवताच्या भाजीत केवळ 43 कॅलरीज असतात.

 पालेभाज्या हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं. चाकवताची भाजी ही त्यातलीच एक पालेभाजी आहे. चाकवताच्या भाजीतील गुणधर्म आणि पोषक तत्त्वांमुळे आरोग्यतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ चाकवताची भाजी हिवाळ्यात खाण्याचा सल्ला देतात.

आहारतज्ज्ञ सांगतात , की चाकवत ही एक महत्त्वाची आणि आरोग्यदायी भाजी आहे. त्याची पानं अँंटीस्कॉब्युटिक आणि अँटीड्युरेटिक आहेत. यामधे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. चाकवताच्या भाजीत अ, क आणि ब जीवनसत्त्वं, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस ही महत्त्वाची खनिजं असतात. या भाजीत अँण्टिऑक्सिडण्टस असून या भाजीतून भरपूर अमीनो अँसिड मिळतात. ही भाजी वेगवेगळ्या स्वरुपात खाण्याचे भरपूृर आरोग्यदायी फायदे आहेत.

Image: Google

चाकवत का असते महत्त्वाची?

1. चाकवताच्या भाजीत भरपूर प्रमाणात अमीनो अँसिड असतात. आपल्या शरीरातील पेशींच्या निर्मितीत अमीनो अँसिडची भूमिक महत्त्वाची असते. पेशींची झीज भरुन काढणं, नवीन पेशी निर्मिती करणं आणि पेशींची दुरुस्ती करणं हे काम अमीनो अँसिड करतात. शरीरातील पेशीनिर्मितीसाठी चाकवताची भाजी म्हणूनच उपयुक्त आहे.

2. फायबर आणि रेचक गुणधर्म चाकवतात भरपूर प्रमाणात असल्याने चाकवत खाल्ल्याने पचन सुधारतं, बध्दकोष्ठतेचा त्रास होत नाही.

3. वजन कमी करण्यासाठी चाकवताची भाजी महत्त्वाची मानली जाते. कारण 100 ग्रॅम चाकवताच्या भाजीत केवळ 43 कॅलरीज असतात. म्हणूनच वजन कमी करणार्‍यांसाठी ही भाजी उपयुक्त असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.

4. त्वचेचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी आहार चांगला असणं आवश्यक आहे. आहार जर पोषक घटकांनी युक्त नसेल तर त्वचा खराब होते, चेहर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येणं, फोडं येणं यासारख्या सौंदर्यविषयक समस्या केवळ शरीरातील अशुध्द रक्ताने होतात. चाकवताच्या भाजीत रक्त शुध्द करणारे घटक असतात. रक्त शुध्दीसाठी ही भाजी किमान आठवड्यातून दोनदा तरी खायला हवी.

Image: Google

5. चाकवताच्या भाजीत प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्वं असल्यानं ही भाजी केसांच्या मुळांना ताकद पुरवते. त्यामुळे केस गळती थांबते. केस मुलायम आणि चमकदार होतात. मजबूत केसांसाठी चाकवताच्या भाजीतील गुणधर्म फायदेशीर असतात.

6. सध्याच्या काळात आपलं कम्प्युटर स्क्रीनसमोर बसून काम करणं वाढलं आहे. त्याचा ताण डोळ्यांवर होवून डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. चाकवतात झिंक आणि लोहाचं प्रमाण चांगलं असल्यानं दृष्टी सुधारण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

7. तोंडाला दुर्गंधी येणं ही फारच लाजिरवाणी बाब असते. वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांनीही तोंडाला दुर्गंधी येते. तोंडांच्या दुर्गंधीने व्यक्तीमत्त्वात न्यूनगंड निर्माण होतो. ही तोंडाची दुर्गंधी घालवण्याचा सोपा मार्ग म्हणजे चाकवताच्या भाजीचा आहारात समावेश करणं. चाकवताची भाजी नियमित खाल्ल्याने दात, हिरड्यांशी निगडित अनेक समस्या दूर होतात.
आहारात चाकवताचा समावेश करण्यासाठी चाकवताची कोरडी भाजी, चाकवताची ताकातली पातळ भाजी आणि चाकवताचे रुचकर पराठे करता येतात.

Image: Google

चाकवताची सुकी भाजी

चाकवताची सुकी भाजी करण्यासाठी एक जुडी चाकवत, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठ्या कांदा जाडसर चिरलेला, 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, हिंग, हळद, मीठ आणि जिरे आणि तेल एवढं साहित्य घ्यावं.
चाकवताची भाजी करताना हरभर्‍याची डाळ सहा ते सात तास भिजवून घ्यावी. चाकवत व्यवस्थित निवडून ती गार पाण्यात मीठ टाकून थोड्या वेळ भिजवून ठेवावी. 10-15 मिनिटांनी पाणी काढून भाजी स्वछ धुवून घ्यावी. भाजी बारीक चिरुन घ्यावी. कांदा जाडसर कापून घ्यावा. लसणाचे छोटे तुकडे करावेत. हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात. भिजलेली डाळ उपसून घ्यावी.

कढईत तेल गरम करुन त्याला आधी मोहरी आणि जिर्‍यांची फोडणी द्यावी. गरम तेलात आधी लसूण घालून परतून घ्यावा. मग मिरची परतावी. कांदा परतून झाला की त्यात चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घालावी. हे चांगलं परतून घ्यावं. मग भिजवलेली डाळ घालून ती परतावी. डाळ परतली गेली की बारीक चिरलेला चाकवत फोडणीत घालून भाजी चांगली हलवून घ्यावी. भाजीवर झाकण ठेवून एक वाफ काढावी. मग त्यात चवीनुसार मीठ घालून भाजीतील डाळ शिजेपर्यंत भाजी शिजवावी. ही भाजी पोळीपेक्षाही बाजरीच्या भाकरीसोबत खावी.

Image: Google

चाकवताची ताकातली भाजी

चाकवताची ताकातली भाजी करण्यासाठी 1 जुडी चाकवत, 5 वाट्या ताजं ताक, 3-4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, ओल्या किंवा सुक्या खोबर्‍याचे पातळ काप, 1 मोठा चमचा बेसन, पाव वाटी भिजवलेले शेंगदाणे किंवा हरभरा डाळ , गोडा मसाला, जिरे, मोहरी, कढीपत्ता हे फोडणीचं साहित्यं घ्यावं.

ही भाजी करताना आधी चाकवत नीट निवडून स्वच्छ धुवून घ्यावा. आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे किंवा चण्याची डाळ 4-5 तास आधी पाण्यात भिजत घालावेत. खोबर्‍याचे पातळ काप करुन घ्यावेत. कढईत नेहमीप्रमाणे तेल घेऊन ते तापवून घ्यावं. त्यात जिरे, मोहरीची घलावी. नंतर कढीपत्ता, जाडसर ठेचलेला लसूण आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. नंतर त्यात भिजवलेले शेंगदाणे किंवा डाळ घालावी. खोबर्‍याचे काप घालून हे सर्व आधी नीट परतून घावं. मग त्यात चिरलेला चाकवत घालावा. भाजी नीट परतून त्यावर झाकण ठेवावे. थोडे पाणीही ठेवावेत. चाकवत शिजायला 3-4 मिनिटे पुरतात. तोपर्यंत ताजं ताक घेऊन त्यात किसलेलं आलं, चिमूटभर साखर, भाजीच्या अंदाजानं मीठ आणि एखादी लसूण पाकळी ठेचून घालावी. झाकण काढून शिजलेला चाकवत चांगला घोटून घ्यावा. त्यात ताकाचं मिश्रण, बेसन पीठ आणि गोडा मसाला घालावा. हे उकळून एकजीव होवू द्यावं. किंवा रवी/ हॅण्ड मिक्सरचा वापर करुन चाकवत आणि ताकाचं मिश्रण घोटून घ्यावं. यामुळे ते चांगलं एकजीव होतं.

दुसर्‍या छोट्या कढईत तेल तापवायला ठेवावं. त्यात जिरं, ठेचलेला लसूण आणि हिंग यांची फोडणी करुन ती उकळत्या भाजीवर घालावी. अजून एखादी उकळी घेऊन गॅस बंद करावा. चाकवताची ही ताकातली भाजी चाकवताची कढी म्हणून ओळखली जाते. ही भाजी भाकरी आणि भातासोबत छान लागते.

Image: Google

चाकवताचे पराठे

चाकवताचे पराठे पौष्टिक आणि चविष्ट लागतात. चाकवताचे पराठे करताना चाकवत नीट धुवून, थोड्या वेळ मीठाच्या पाण्यात भिजवून ठेवावा. नंतर चाकवत पुन्हा धुवून बारीक चिरुन घ्यावा. किंवा चाकवताचं प्रमाण घेऊन अगदी तेवढचं, बेताचं पाणी घेऊन त्या पाण्यात चाकवत उकळून घ्यावा. थोड्यावेळ तो तसाच पाण्यात राहू द्यावा. चाकवत फार काळ उकळू नये , नाहीतर त्यातील पोषक घटक निघून जातात. उकळेला चाकवत थंड झाल्यवर पाण्यासह मिक्सरमधून वाटून घेऊन त्याची प्युरी तयार करावी. अशा प्रकारचा पराठा करतान पीठ मळतान जास्त पाणी लागत नाही. चाकवत चिरुन घालणार असाल तर थोडं जास्त पाणी लागतं.
चाकवताचे पराठे करताना 4 कप चाकवताची पानं, 1 मोठा कप पाणी, 3 कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरेपूड, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा तेल, पराठे भाजण्यासाठी साजूक तूप घ्यावं.

पराठे करतान आधी चाकवत निवडून धुवून, पाण्यात भिजवून घ्यावा. एका कढईत चाकवताचं प्रमाण बघून बेतानं पाणी घेऊन ते उकळायला ठेवावं. पाणी उकळायला लागलं की त्यात चाकवताची पानं घालावीत. 3-4 मिनिटात चाकवताची पानं एकदम मऊ होतात.

नंतर एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ घ्यावं. यात ओवा हातावर चोळून मग घालावा. जिरेपूड, हिंग आणि मीठ घालावं. पिठात हे चांगलं मिसळून घ्यावं. उकळेलेली पानं मिक्सरमधून काढून त्याची प्युरी करुन घ्यावी. प्युरी करतानाच त्याच हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत. चाकवआची ही प्युरी मग कणकेत घालून पीठ मळून घ्यावं. 15-20 मिनिटं ते थोडं सेट होवू द्यावं. पिठावर सुती कपडा ओला करुन पिळून झाकावा. 20 मिनिटानंतर पिठाच्या मध्यमसर लाट्या घेऊन पराठे लाटावेत. हे पराठे खूप पातळही नको आणि खूप जाडही नको. पराठा लाटताना गव्हाचं कोरडं पीठ किंवा तांदळाचं पीठ घ्यावं. लाटलेले पराठे तवा गरम करुन थोडं तुप घालून दोन्ही बाजुंनी खरपूस सोनेरी रंगावर शेकावेत. चाकवताचे हे पराठे दही किंवा आवडत्या लोणच्यासोबत खावेत.

Web Title: How to include healthy bathua in diet for 7 health benefits ! 3 Tasty and Easy recipes of Bathua

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.