अळीव म्हणजेच अहळीव किंवा हळीव. थंडीच्या दिवसांत ज्याप्रमाणे डिंक, पौष्टीरक लाडू, मेथीचे किंवा जवसाचे लाडू केले जातात त्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी अळीवाचे लाडूही खूप पौष्टीक असतात. अळीवात मोठ्या प्रमाणात लोह, फॉलेट, व्हीटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन इ, फायबर, प्रोटीन हे घटक असतात. त्यामुळे लहान मुले आणि विशेषत: महिलांच्या आरोग्यासाठी हे लाडू अतिशय पौष्टीक मानले जातात. दररोज एक अळीव लाडू खाल्ल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. थंडीचा ऋतू हा तब्येतीसाठी चांगला असल्याने या काळात खाल्लेले अन्न चांगले पचते आणि वर्षभर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. अळीवाच्या लाडूचे शरीराला होणारे फायदे आणि त्याची रेसिपी पाहूयात....
साहित्य -
अळीव - १०० ग्रॅम
नारळाचे पाणी - १ वाटी
नारळाचा चव - ३ वाटी
गूळ - १ वाटी
बदाम - ५ ते ६ कापलेले
काजू - ५ ते ६ कापलेले
कृती -
१. एका भांड्यात नारळाच्या पाण्यात अळीव भिजवा. रात्रभर अळीव चांगले भिजू द्या. नारळाचे पाणी आवडत नसेल तर थोडे दूधही घालू शकता. पण नारळाच्या पाण्यामुळे लाडूला एक प्रकारचा फ्लेवर येतो. हे दोन्हीही आवडत नसेल तर साध्या पाण्यात भिजवले तरी चालते.
२. सकाळी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात नारळाचा चव, गूळ, भिजवलेले अळीव, काजू आणि बदाम घाला.
३. गॅस बारीक ठेवा नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते. १५ मिनिटे बारीक गॅसवर हे मिश्रण एकजीव होऊद्या.
४. हे मिश्रण गॅसवरुन खाली उतरवा, गार झाल्यावर त्याचे एकसारखे लाडू वळा.
५. अळीवाच्या लाडूला नारळाचे प्रमाण योग्य लागते. नारळाचा चव कमी असल्यास हा लाडू चांगला लागत नाही. तुम्हाला सुकामेवा नको असेल तर नाही घातला तरी चालतो.
६. हे लाडू ४ ते ५ दिवस बाहेर सहज टिकतात. ओला नारळ असल्याने जास्त दिवस बाहेर ठेवल्यास हे लाडू खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त दिवस टिकल्यास लाडू फ्रिजमध्ये ठेवा.
अळीवाचे लाडू खाण्याचे फायदे
१. पोट साफ होण्यास मदत
हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पोट साफ होण्याची अडचण असते. कधी अॅसिडीटी, गॅसेस, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी उद्भवतात. पण अळीवाचे सेवन केल्याने या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
२. मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात
हल्ली तरुणींना किंवा महिलांना मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात. अनियमित मासिक पाळी, अती प्रमाणात रक्तस्राव होणे, पोट, पाय कंबर दुखणे अशा तक्रारींचा यामध्ये समावेश असतो. अळीवात असलेल्या घटकांमुळे हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि मासिक पाळीशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते.
३. वजन नियंत्रणात राहण्यास मदत
सकाळी उपाळीपोटी चमचाभर अळीव कोमट पाण्यातून खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे अशांनी आहारात अळीवाचा समावेश करावा.
४. मानसिक आरोग्यासाठी उत्तम
अळीवात असणारे घटक मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासही उपयुक्त असतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या ताणांसोबत जीवन जगत असताना अळीव खाल्ल्याने डोके शांत राहण्यास मदत होते. तसेच भावनांचे नियोजन करण्यातही अळीव खाण्याचा फायदा होतो.
५. त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त
महिलांना नितळ त्वचा आणि लांबसडक दाट केस हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे बाह्य उपाय केले जातात. पण अळीवाचा आहारात समावेश केल्यास केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पोटातून अळीव घेण्याबरोबरच अळीवाची पेस्ट करुन त्यात मध घालून हे मिश्रण त्वचेला लावल्यास त्वचेवरील डाग, फोड कमी होण्यास मदत होते. तसेच लोह, मॅग्नेशिअम, प्रोटीम यांसारख्या घटकांमुळे केस दाट आणि लांब होण्यास मदत होते.
६. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत - अळीव आरोग्याला अतिशय फायदेशीर असतात. याच्या नियमित सेवनाने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आपण विविध आजारांपासून स्वत:चा सामना करु शकतो.