घरातील बागेत तुळस लावण्यासोबतच कोरफडही आवर्जून लावली जाते. त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी घरचा उपाय म्हणून बागेतल्या कोरफडीला विशेष महत्त्व असतं. ती कापून तिचा गर काढून तो केसांसाठी आणि त्वचेसाठी वापरला जातो. कोरफड गराच्या अशा उपयोगानं केसातील कोंडा, त्वचेवरील सुरकुत्या, कोरडेपणा य समस्या दूर होतात. कोरफडीत मॉश्चरायझिंग गुणधर्म असल्यानं नैसर्गिक मॉश्चरायझर म्हणून कोरफडीकडे बघितलं जातं. पण त्वचा आणि केस यासाठी फायदेशीर असलेली कोरफड एकूण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर , परिणामकारक आणि महत्त्वाची आहे.
Image: Google
निरोगी आरोग्यासाठी कोरफडीचा रस पिण्याचा, कोरफडचा गर खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण कोरफड खाणं हा उपाय अनेकांना फारच विचित्र वाटतो. एक औषध म्हणून कोरफडीचा गर खाल्ल्यास, ज्यूस पिल्यास वजनाची समस्या असेल तर वजन झपाट्यानं कमी होतं. कोरफडचा रस पिल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य राखली जाते. म्हणूनच मधुमेह-2 ग्रस्त रुग्णांना कोरफडचा रस पिण्यासा सल्ला तज्ज्ञ देतात. कोरफड रस किंवा गर स्वरुपात सेवन केल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेशींमधे नायट्रिक ऑक्साइड, साइटोकिन्स हे रोगप्रतिकारक शक्तीला चालना देतात.
Image: Google
कोरफड ही जीवाणू आणि अतिसूक्ष्मजीवविरोधी असल्यानं तोंडांचं आतील आरोग्य राखण्यासाठी कोरफड सेवन करण्यास महत्त्व आहे. कोरफड सेवनानं हिरड्यातून रक्त येणं, तोंडाच्या आतात अल्सरसारखे पांढरे डाग येऊन त्यातून रक्त येणं यासारखे आजार दूर होतात. कोरफड ज्यूस संधिवात, सांध्यांचा दाह यावर उपकारक आहे.
एक औषध म्हणून ज्यूस आणि गर स्वरुपात कोरफड सेवन करण्याचे हे असे महत्त्वाचे फायदे आहेत. पण कोणी म्हटलं की चव म्हणून कोरफड खा तर हे आपल्याला पटेल का? याचं उत्तर आहे पटलंच पाहिजे. कारण भाजी, लोणचं या स्वरुपात कोरफड अतिशय चवदार लागते. अशा चविष्ट पध्दतीनेही कोरफड आहारात समाविष्ट करता येते. आठवड्यातून एकदा, महिन्यातून तीन ते चार वेळा कोरफडीची भाजी खाणं हे आरोग्यासाठी अत्यावश्यक मानलं जातं. कोरफड ही औषधी म्हणून एका झटक्यात तिचा गर किंवा रस गिळणं ही गोष्ट वेगळी पण चवीचवीनं भाजी आणि लोणचं या स्वरुपात खाणं हे त्यांनाच अशक्य वाटू शकतं, ज्यांना कोरफडीच्या भाजी आणि लोणच्याची चव माहिती नाही. कोरफड चवीष्ट पध्दतीनं खाता येणं अशक्य हा आपल्या मनातील समज आणि पूर्वग्रह दूर करण्याची सोपी पध्दत म्हणजे कोरफडीची भाजी आणि लोणचं कसं करायचं हे शिकून, ते करुन आणि खाऊन बघणं.
Image: Google
कशी करतात कोरफडची चविष्ट भाजी?
कोरफडची भाजी करण्यासाठी 4 कप कापलेले कोरफडीचे तुकडे, 1 मोठा चमचा बेदाणे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, पाऊण चमचा आमचूर पावडर, 3 मोठे चमचे तेल, थोडे जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा दही घ्यावं.
कोरफडीची भाजी करताना आधी कोरफडीचे पाते धुवून घ्यावे. कोरफडीच्या पात्यांच्या कडेला असलेले काटे छिलून घ्यावेत. कोरफडीचे बारीक तुकडे करावेत. एका भांड्यात ते घालून त्यात एक ग्लास पाणी घालावं आणि कुकरमधे ठेवून दोन शिट्या काढाव्यात किंवा बाहेर 15-20 मिनिटं उकळून घ्यावेत. कुकरमधे शिजलेले कोरफडीचे तुकडे थंड पाण्यानं धुवून घ्यावेत.
Image: Google
कढईत तेल गरम करावं. गरम तेलात जिरे आणि हिंग फोडणीला घालावं. जिरे तडतडले की मग हळद घालावी आणि लगेच उकडलेले कोरफडीचे तुकडे घालावेत. ते फोडणीत 1-2 मिनिट परतून घ्यावेत. नंतर यात दही, बेदाणे, लाल तिखट, आमचूर पावडर, साखर आणि मीठ घालावं. हे सर्व घालून झाल्यावर भाजी चांगली परतून घ्यावी. भाजीवर झाकण ठेवून ती 20 मिनिटं शिजवावी. मधून मधून झाकण काढून भाजी हलवत राहावी. वीस मिनिटानंतर भाजी शिजली की ती गरम गरम खावी. लगेच खायची आहे या बेतानंच ही भाजी करावी. ही भाजी अतिशय चविष्ट लागते.कोरफड सेवन करण्याचे जे सर्व फायदे वर सांगितलेले आहेत, ते सर्व ही कोरफडची भाजी खाल्ल्याने मिळतात. म्हणून कोरफडची भाजी आहारात असण्याला महत्त्व आहे.
Image: Google
कोरफडचं लोणचं
औषधी कोरफडचा उपयोग जेवणातील चटक मटक चवीची गरज भागवण्यासाठीही करता येतो. कोरफडचं लोणचं औषधी आणि छान चटपटीत लागतंकोरफडचं लोणचं करताना 2 जास्त गर असलेले कोरफडचे पाते, 100 ग्रॅम मोहरीची दाळ, 25 ग्रॅम ओबडधोबड वाटलेली बडिशेप, 20 ग्राम लाल तिखट, 1 चमचा मेथी पावडर, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, 150 मि.ली तेल आणि चवीनुसार मीठ लागतं.
लोणचं करण्यासाठी आधी कोरफडीचे पाते धुवून पुसून स्वच्छ करावेत. कोरफडच्या कडेला असलेले काटे छिलून घ्यावेत. कोरफडच्या पात्याचे बारीक तुकडे करावेत. या तुकड्यांना मीठ लावून तीन तास ठेवावं. तीन तासानंतर कढईत तेल गरम करावं. तेलातून धूर निघेल एवढं ते गरम करावं. गॅस बंद करुन तेल गार होवू द्यावं. तेल गार झाल्यावर त्यात सर्व मसाले टाकून तेल नीट हलवून घ्यावं. मीठ लावलेले कोरफडीचे तुकडे हाताने पिळून त्यातलं पाणी काढून टाकावं. हे तुकडे मसाल्याच्या कढईत घालून ते मसाल्यात मिसळून घ्यावेत. फोडी मसाल्यात मिसळल्या की एका स्वच्छ काचेच्या बरणीत लोणचं भरुन झाकण घट्ट लावून ठेवाव. या बरणीला 3-4 दिवस ऊन दाखवावं. लोणचं घातल्यानंतर साधारणतं पाच सहा दिवसात कोरफडचं हे लोणचं खाण्यायोग्य मुरतं.
Image: Google
कोरफडचं आंबट गोड लोणचं
कोरफडचं झटपट आंबट गोड लोणचं करता येतं. आंबट गोड लोणच्यासाठी 200 ग्रॅम कोरफड, अर्धा कप गुळ, 1 छोट चमचा बडिशेप, 1 छोटा चमचा कांद्याचं बी ( कलौंजी), 1 छोटा चमचा मेथ्या, 2 चमचे व्हिनेगर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि 3 मोठे चमचे तेल घ्यावं.
कोरफडचं आंबट गोड लोणचं करताना सर्वात आधी कोरफडचे पाते स्वच्छ धुवून घ्यावेत. पातीच्या कडेला असलेले काटे छिलून घ्यावेत. कोरफडचे बारीक तुकडे करुन ते पाण्यात घालून उकळून घ्यावेत.
एका कढईत तेल गरम करावं. त्यात मेथ्या, कांद्याचं बी, बडिशेप, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून ते चांगलं एकत्र मिसळून घ्यावं. मसाला चांगला मिसळला गेला की त्यात गूळ घालावा. गूळ मिर्शणात कालवून घेतला की त्यात उकडलेले कोरफडीचे तुकडे आणि व्हिनेगर घालावं. हे मिश्रण पुन्हा एकदा नीट हलवून घेतलं की कोरफडचं आंबट गोड लोणचं खाण्यास तयार होतं. इतका सोपा आणि झटपट लोणच्याचा प्रकार आहे हाकोरफडची भाजी आणि लोणचं खाऊन बघितल्यास कोणती भाजी आवडते असं विचारल्यास कोरफडची आवडते असं कोणी सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटणार नाही.------------------------------------------------------------------------------------------------------------------
Image: Google
कोरफड सेवन अती वर्ज्यच!
कोरफड ही ज्यूस आणि गर स्वरुपात सेवन करणं हे आरोग्यासाठी चांगली आणि फायदेशीर बाब आहे. कोरफडमुळे आरोग्य सुधारतं, वजन कमी होतं हे अगदी खरं. पण म्हणून कोरफडचा ज्यूस रोज पिणं हे त्रासदायक आहे असं आयुर्वेद म्हणतं. आयुर्वेदानुसार कोरफडचा ज्यूस रोज पिल्यास मूळव्यधीचा त्रास होतो. त्यामुळे आठवड्यातून दोन तीनदा किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोरफडचा ज्यूस पिणे योग्य.
कोरफडचा गर औषध म्हणून खातात तशीच कोरफड ही जेवणात भाजी आणि लोणच्याच्या स्वरुपातही खाता येते. कोरफडची भाजी आणि लोणचं दोन्ही चवीला छान लागतं. भाजी आणि लोणचं करताना कोरफडीत विविध मसाले घातले जात असल्याने ती चवदार लागते.
सध्याच्या आहार पद्धतीचा विचार केला तर आपण आपल्या मूळ खाण्यापासून बरेच लांब आलो आहोत. त्याचाच परिणाम परसातल्या भाज्यांचा आहारात समावेश होण्याचं प्रमाण कमी झालं. पूर्वी अंगणातल्या बागेत उगवलेला माठ, तांदुळका, पालक, आळू . गिलकं, भोपळा, डांगर यांचा समवेश होता. कोरफडची भाजी किंवा लोणचं म्हणजे कोरफड सेवनाचा आधुनिक पर्याय नाही. पूर्वीचे लोक अंगणातल्या कोरफडीची भाजी आणि लोणचं आवर्जून करायचेत. पण कुठलीही गोष्ट अती करणं हे वर्ज्य आणि त्रासदायक असते. म्हणूनच कोरफडची भाजी चविष्ट लागते, लोणचं चटपटीत लागतं म्हणून रोज खाल्लं तर त्रास हा होणारच. महिन्यातून तीन ते चार वेळा कोरफडची भाजी खाणं आरोग्यास फायदेशीर ठरते. आणि लोणचंही अगदी सकाळ संध्याकाळ रोज न खाता अधे मधे खावं, त्याचा फायदा होतो.- वैद्य रजनी गोखले(प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ)