Join us  

चुटकी में डोसा कसा शक्य आहे? ब्रेडचे डोसे .. चटपटीत डोशाचा झटपट प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 7:45 PM

How To Make Bread Dosa: ब्रेडचे कटलेट हे ब्रेडचे पदार्थ ऐकून आणि खाऊनही माहिती असतात. पण ब्रेडचा डोसा हा ऐकायला नवीन वाटत असला तरी अतिशय चविष्ट आणी झटपट होणारा आहे.

ठळक मुद्दे ब्रेडचे डोसे करण्यासाठी डाळ, तांदूळ याची गरज नसते. या डोशांसाठी मिश्रण आंबवण्याचीही गरज नसते.ब्रेडचे डोसे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो.

नाश्त्याला डोसा, चटणी , सांभार ही बहुतेकांची आवडती डिश. पण इच्छा झाली आणि डोसा बनवला असं होत नाही. तांदूळ, डाळ भिजवणं, वाटणं, आंबवणं या प्रक्रियेत दिड दिवस तर जातोच. त्यामुळे इच्छा झाल्याबरोबर असा डोसा खायला मिळणं अवघडच. पण एक चटपटीत डोशाचा झटपट प्रकार आहे. तो म्हणजे ब्रेडचा डोसा. ब्रेडचं सॅण्डविच, ब्रेड भजी , ब्रेडचे कटलेट हे ब्रेडचे पदार्थ ऐकून आणि खाऊनही माहिती असतात. पण ब्रेडचा डोसा हा ऐकायला नवीन वाटत असला तरी अतिशय चविष्ट आणी झटपट होणारा आहे.

या डोशासाठी डाळ, तांदूळ याची अजिबात गरज नाही. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी लागणार्‍या घाईच्या भुकेसाठी ब्रेडचा डोसा म्हणजे एकदम रुचकर पर्याय आहे.

Image: Google

कसा करायचा ब्रेडचा डोसा?

ब्रेडचा डोसा करण्यासाठी 8-9 ब्रेड स्लाइस, पाव कप तांदळाचं पीठ, 2 मोठे चमचे बेसन, पाव कप आंबट दही, चवीनुसार मीठ, एक ते सव्वा कप पाणी, छोटा चमचा बेकिंग सोडा घ्यावा. तर फोडणीसाठी 1 छोटा चमचा तेल, मोहरी, जिरे, चिरलेला कढीपत्ता, चिमूटभर हिंग, कांदा, मिरची, कोथिंबीरही बारीक चिरुन घालता येते.

Image: Google

ब्रेडचा डोसा बनवताना सर्वात आधी ब्रेडचे छोटे तुकडे करुन ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. ब्रेडचा चुरा एका भांड्यात काढून त्यात तांदळाचं पीठ, बेसन, दही आणि पाणी घालून डोशाप्रमाणे मिश्रण करावं. नंतर यात तडका घालण्यासाठी छोट्या कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी, जिरे घालावेत. ते तडतडले की बारीक चिरलेला कढीपत्ता घालावा. नंतर चिमूटभर हिंग घालून ही फोडणी डोशाच्या मिश्रणात घालावी. मिश्रण चांगलं हलवून घ्यावं. नंतर त्यात बेकिंग सोडा घालून मिश्रण पुन्हा नीट हलवून घ्यावं.

Image: Google

नॉन स्टिक तवा गरम करावा. त्याला थोडं तेल लावावं. चमच्यानं डोशाचं मिश्रण तव्यावर टाकून ते हलक्या हातानं गोल पसरावं. गॅसची आच मंद असावी. डोसे मंद आचेवरच भाजावेत. हे डोसे भाजण्यास वेळ लागतो. डोसे तेल लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. हा डोसा चटणी, सांभारसोबत मस्त लागतो.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.