पोळ्या किंवा चपात्या लाटणं आणि त्या व्यवस्थित भाजता येणं हे मोठं कौशल्याचं काम... छान मऊसर, गोल गलगरीत पोळ्या जमल्या की अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक यायला लागला असं समजावं.., असं जुन्या बायका म्हणायच्या ते काही खोटं नाही.. शिवाय पोळी म्हणजे जेवणातला असा पदार्थ की तो ताटात असला तरी पोट भरल्यासारखं वाटतं.. एक वेळ भाजी नसली तरी अडत नाही, पण पोळी (chapati recipe) असलीच पाहिजे, असा आग्रह अनेक घरांमध्ये असताे..
पण पोळी लाटायची म्हटलं की अनेक जणींना टेन्शन येतं.. काहीही करा पोळी कडकच होते किंवा वातडच होते. अशी अनेक जणींची तक्रार. पोळीचा घास तोडल्यावर जेव्हा पोळीचे तीन किंवा चार पदर दिसतात, तेव्हा ती पोळी परफेक्ट जमली आहे असं मानलं जातं. अशी परफेक्ट पोळी जमण्यासाठी थोडी प्रॅक्टीसची गरज तर असतेच पण त्यासोबतच पोळ्याचं परफेक्ट तंत्रही समजून घेणं गरजेचं असतं. कणिक मळण्यापासून ते पोळी भाजून ठेवेपर्यंत काही लहान- सहान गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि फाॅलो केल्या, तर मग बघा कशी फुलते आणि छान होते तुमची पोळी....
पोळी मऊसर व्हावी, म्हणून या गोष्टी करा..
१. तुम्ही कणिक कशी भिजवता यावर पोळी कडक होणार की मऊ हे अवलंबून असतं. त्यामुळे पोळ्या चपात्या करण्यासाठी जी कणिक भिजवणार आहात ती मऊसर असली पाहिजे. कणिक जर खूप घट्ट मळली तर नक्कीच पोळ्या कडक होणार. त्यामुळे बोटाने अलगदपणे दाब दिला तरी तुमच्या कणकेचा उंडा दबला गेला पाहिजे, अशी कणिक भिजवा.
२. कणिक भिजवताना त्यात चिमुटभर मीठ टाकायला विसरू नका. मीठ टाकल्याने कणकेला आणि पोळ्यांना मऊपणा येतो.
३. जेव्हा कणिक भिजवून होईल, तेव्हा त्यावरून तेलाचा हात फिरवायला विसरू नका. कणकेच्या गोळ्याला तेल लावा आणि हाताच्या तळव्यांनी दाब देऊन कणिक चांगली मळून घ्या. जेवढी चांगली कणिक मळल्या जाईल, तेवढ्या पोळ्या मऊ होतात.
४. कणिक भिजवल्या भिजवल्या लगेच पोळ्या लाटू नका. थोडा वेळ जाऊ द्या. कणिक भिजवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. १५ ते २० मिनिट ती तशीच राहू द्या आणि त्यानंतर पोळ्या लाटा.
५. खूप मोठ्या किंवा खूप मंद आचेवर केलेल्या पोळ्या बऱ्याचदा कडक होतात किंवा मग कच्च्या राहतात. त्यामुळे पोळ्या करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा.
६. अनेकदा पोळी भाजताना ती काठांना कच्ची राहते, चांगली भाजली जात नाही. त्यामुळेही ती कडक होऊ शकते. त्यामुळे पोळी तव्यावर असताना तिचे काठ भाजण्यासाठी पावभाजीचं स्मॅशर वापरा आणि दाब देऊन काठ भाजून घ्या.
७. पोळी तव्यावरून खाली काढली की खूप जास्त वेळ तशीच ठेवू नका. तिला लगेचच तेल किंवा तूप लावा आणि ती दुमडून ठेवा. तशीच ठेवली तर ती कडक होऊ लागते.
video credit- Riyanshi Food and Art