खजूर कुठेही सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. दिर्घकाळ टिकणारे आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असे हे फळ नियमित खायला हवे. खजूरात कार्बोहायड्रेट, प्रथिने, व्हिटॅमिन ए, फट्स, कॉपर, व्हिटॅमिन के, सेलेनियम, कोलेस्टेरॉल, सोडियम, फायबर, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम कॅल्शियम हे घटक असतात. हे सगळे घटक शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे खजूर खाल्ल्यास शरीराचे पोषण होण्यास मदत होते. पाहूयात खजूराचे लाडू कसे करायचे..
साहित्य -
१. खजूर ( बिया काढलेला) - २ वाट्या
२. बदाम पूड - अर्धी वाटी
३. काजू पूड - पाव वाटी
४. पिस्ता पूड - पाव वाटी
५. खोबरे कीस - अर्धी वाटी
६. गूळाची पावडर - गरज वाटल्यास आणि आवडीनुसार
७. तूप - ३ ते ४ चमचे
कृती -
१. खजूराच्या बिया काढून घ्या खजूर स्वच्छ धुवून घ्या. बाजारात हल्ली सीडलेस खजूरही मिळतो. काळा खजूर असल्यास आणखी चांगले.
२. गॅसवर कढई ठेवून ती पूर्ण तापवा. त्यात तूप घालून खजूर घाला आणि हा खजूर ५ ते ७ मिनीटे तूपावर भाजून घ्या. खरपूस वास आणि रंग आला की गॅस बंद करा.
३. एकीकडे बदाम काजू आणि पिस्ता यांची मिक्सरवर पूड करुन घ्या.
४. खजूर एका ताटात काढून किसलेले खोबरे भाजून घ्या. खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. खोबरे शक्यतो मध्यम आचेवर भाजावे, म्हणजे ते खरपूस भाजले जाते.
५. भाजलेले खोबरे खजूरावर घाला. त्यावर किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर आणि मिक्सर केलेला सुकामेवा घाला. खजूर बऱ्यापैकी गोड असतो, त्यामुळे फार गोड आवडत नसेल तर गूळ घआतला नाही तरी चालेल.
६. हे मिश्रण व्यवस्थित हाताने एकजीव करा आणि त्याचे लहान लहान लाडू वळा.
७. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खारीक पावडर, मनुका व इतर सकामेवाही घालू शकता.
थंडीत खजूर खाण्याचे फायदे
१. अशक्तपणासाठी फायदेशीर - खजुरामध्ये ग्लुकोज, शुक्रोज आणि फ्रुक्टोज यासारख्या नैसर्गिक शर्करांचे प्रमाण व्यवस्थित असते. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आला असेल तर तो भरुन येण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतात. खजूरातील प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांपासून शरीराला ताकद मिळण्यास मदत होते. खजूरात लोहाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे खजूर आणि दूध घेतल्यास टवटवी येण्यास मदत होते.
२. हाडांसाठी उपयुक्त - हाडांना मजबूती येण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतो. खजूरात हाडांना उपयोगी असणारे पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. या घटकांमुळे हाडांचे पोषण होते. अनेकांना उतारवयात संधिवात, हाडांचा ठिसूळपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. पण तुम्ही नियमित खजूराचे सेवन करत असाल तर तुम्हाला अशाप्रकारचा त्रास होत नाही किंवा झाला तरी त्याची तीव्रता कमी असते.
३. त्वचा चांगली राहण्यास मदत - खजूरातील घटक ज्याप्रमाणे आरोग्यासाठी चांगले असतात, त्याप्रमाणे ते त्वचेसाठीही उपयुक्त असतात. त्वचा चांगली असेल तर तुमचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. त्यामुळे खजुराचे नियमित सेवन केल्यास चेहरा मुलायम आणि नितळ दिसण्यास मदत होते.
४. पचनाच्या तक्रारी दूर होण्यास उपयुक्त - चांगले पचन व्हावे यासाठी आहारात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. खजूरात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पदधतीने पचन होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी उद्भवत नाहीत. फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्ले जात नाही.
५. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त - खजूरामध्ये इतर फळांपेक्षा पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच तुम्हाला कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर तीही दूर होण्यास खजूर खाण्याचा उपयोग होतो.