Join us  

आलं/ हळद, डांगराच्या बियांचा चहा कधी प्यायलाय? थंडीत गारठलात प्या 3 हटके चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 6:37 PM

How To Make Different Tea: थंडीत चहा पिण्याची वेगळी मजा घ्यायची असेल तर नेहमीचा चहा टाळून चहाचे हटके प्रकार करा. गुणानं आणि चवीनं उत्तम असणारे चहा थंडीची मजा आणखी वाढवतील.

ठळक मुद्देडांगर बियांचा चहा हा हर्बल टी असून त्याचा क्रिमी पोत चहा पिताना भारी वाटतो.थंडीत होणारे त्रास टाळण्यासाठी आलं हळदीचा चहा दिवसातून एकदा तरी हवाच.टी सूप एकाच वेळेस सूप आणि चहा पिण्याचा वेगळा अनुभव देतो.

थंडीच्या दिवसात कितीही वेळा चहा घेतला तरी कमीच . पण एकाच चवीचा चहा पिऊन कंटाळा येणारच. थंडीत चहा पिण्याची वेगळी मजा घ्यायची असेल तर नेहमीचा चहा टाळून जरा चहाचे हटके प्रकार करायला हवेत. असे हटके प्रकार कुठले आहेत हे शोधण्याचे कष्ट घेऊ नका. ते पर्याय कृतीसह इथेच, या लेखात मिळतील. हे चहा केवळ चवीलाच हटके आहेत असं नाही तर त्यांचे गुणधर्म थंडीच्या वातावरणात आरोग्यास लाभदायकही आहेत.

Image: Google

1. डांगर बियांचा चहा

हा हर्बल चहाचा प्रकार आहे. हा चहा करण्यासाठी डांगराच्या बिया, दूध, तूप आणि कोकोनट बटर यांचा वापर केला जातो. हा चहा पिताना चहाचा क्रिमी पोत भारी वाटतो. हा चहा थंडीत घेणं आरोग्यदायी मानलं जातं. डांगर बियांचा चहा करण्यासाठी 2 कप दूध, 1 चमचा चहा पावडर, 2 चमचे डांगर बिया आणि आवडीनुसार साखर घ्यावी.हा चहा करताना सर्वात आधी भांड्यात 2 कप दूध घालावं आणि ते गरम करायला ठेवावं. दूध गरम झाल्यावर डांगर बिया मिक्सरमधे वाटून त्याची केलेली पावडर दुधात घालावी आणि ती चांगली ढवळून घ्यावी. दुधाला उकळी आली की चहा पावडर आणि कोकोनट बटर घालावं. चहा चांगला गरम होवू द्यावा. चहाला दोन तीन उकळ्या आल्यावर चहा गाळून घ्यावा. हा चहा मस्त गरम गरम घोट घेत प्यावा.

Image: Google

2. आलं हळदीचा चहा

आलं हळदीचा चहा तर हिवाळ्यात दिवसातून एकदा तरी प्यायलाच हवा. या चहामुळे शरीराला आतून ऊब मिळते.आलं हळदीचा चहा करण्यासाठी 2 ते 3 कप पाणी, 1 चमचा किसलेलं आलं, 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस घ्यावा.हा चहा करताना भांड्यात पाणी गरम करायला ठेवावं. पाणी उकळलं की 1 चमचा हळद आणि किसलेलं आलं घालावं. ते चांगलं हलवून घ्यावं. थोडा वेळ पाणी उकळू द्यावं. शेवटी लिंबाचा रस घालावा. चहा गाळून तो गरम गरमच प्यावा.

Image: Google

3. टी सूप

गारठयात वाफाळता चहा, गरम गरम सूप प्यावंसं वाटतं. पण समजा चहा आणि सूप एकत्रच प्यायला मिळालं तर. टी सूप या पेयानं हे शक्य होतं.टी सूप करण्यासाठी 4 ते 5 टमाटे, 3 चमचे जास्मिन चहा, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा ट्रफल तेल, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार काळे मिरे घ्यावेत.

टी सूप करण्यासाठी आधी टमाट्याची सालं सोलून घ्यावीत. टमाट्यातील बिया काढून घ्याव्यात. नंतर मिक्सरमधून टमाट्याची प्युरी करुन घ्यावी. ही प्युरी उकळण्यास ठेवावी. प्युरी उकळली की त्यात मीठ आणि मिरे घालावेत. दुसर्‍या भांड्यात थोडं पाणी घेवून त्यात जास्मिन चहा घालून तो उकळून घ्यावा. नंतर टमाट्याचं मिश्रण आणि चहाचं मिश्रण एकत्र करावं. यात एक चमचा ट्रफल तेल घालून तो प्यावा.