शुभा प्रभू साटम
पॅनकेक म्हणजे फिरंगी धिरडी, धिरडी म्हटलं की नाक मुरडलं जातं पण नाव बदललं की चवीने खातात, हे आपल्याही लक्षात येतंच. परदेशात जे पॅनकेक केले जातात त्यात मध्ये मैदा /अंड/ साखर असते , म्हणजे त्यांची पारंपरिक कृती तशीच आहे. या पॅनकेकवर मग मेपल सिरप, वेगवेगळी फळे,जॅम असे घालून खाल्ले जाते. अमेरिकेत पॅनकेक हे अगदी घरगुती खाणं समजतात. आपल्याकडे कसे आईच्या हातची पुरणपोळी किंवा मोदक आवडीने खातात तसेच थोडेफार. यात वापरले जाणारे साहित्य तसे पौष्टिक नसते.
पण आता आपल्याला हेच पॅनकेक पौष्टिक करता येऊ शकतात.
तर आपण आज बघूया अस्सल देशी पौष्टिक पॅनकेक कसे करायचे ते..
बेसिक साहित्य म्हणजे कणिक ,गुळाची पावडर/काकवी,हवं तर पिठीसाखर घ्या.आवडीप्रमाणे
कणिक १ वाटी
गुळाची पूड /काकवी
तुम्हाला हवं तर साखरसुद्धा घालू शकता, पिठीसाखर अधिक चांगली
गोड ताक/पाणी आवडीप्रमाणे,ताक घेतलं तर चव छान येते
चिमुटभर बेकिंग सोडा,मऊ होण्यासाठी
वर सजवायला स्ट्रॉबेरी/आंबा/सफरचंद काहीही फोडी करून
मेपल सिरप किंवा मध
कृती
पिठात गूळ /साखर/काकवी घालून, गूळ असेल तर तो नीट विरघळेपर्यंत एकत्र करा नाहीतर ओतताना त्रास होईल,
आता यात ताक घालून बेकिंग पावडर घालून छान सरसरीत करून घ्या.
पाचेक मिनिटं ठेवून द्या,जास्त ठेवलं तर चांगलं.
नॉनस्टिक तव्यावर बटर घालून ते गरम झालं की छोटी छोटी धिरडी काढा, गॅस मंद हवा ,दोन्ही बाजूने तपकिरी होईतो शेकून घ्या.वरून मग जे हवं ते टोपिंगस घालायचे आणि मध किंवा मेपल सिरप ओतून द्यावयाचे.
छान मऊ होतात, कणिक असल्याने पौष्टिक पण. सध्या आंबा उपलब्ध असल्याने तो यावर घालून अफलातून लागते. मग दुसऱ्या कशाची गरज नाही
जर वेळ असेल तर आणखीन एक सजावट करू शकता, जी फळं आहेत ती बारीक कापून किंचित वाफवून घ्या,मऊ झाली की त्यात घरात असलेला जॅम घालून गार करा, मस्त तुकतुकीत दिसतात. याचं टॉपिंग पँनकेंक वर करा. अगदी रेस्टोरंट्ससरख दिसते, अश्या टॉपिंगना फ्रुट प्रिसर्व म्हणतात.
पौष्टिक आणि स्टायलिश असा सोपा नाश्ता तयार.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)