तिळगुळाची खमंग, खरपूस, खुसखुशीत आणि कुरकुरीत पोळी जमणं हे खरंतर सुगरणीचंच काम.. सरसर पुरणपोळी लाटणाऱ्या अनेक जणीही संक्रांतीला गुळपोळी करायची म्हटलं की थोड्या घाबरतात. कारण गुळपोळी करताना अनेक बारकावे तपासावे लागतात. तीळ कसे भाजायचे इथपासून ते पोळी कितपत भाजून घ्यायची, इथपर्यंत अनेक छोट्या- छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते. हेच सगळे बारकावे सांगत संक्रांतीला परफेक्ट गुळपोळी कशी करायची, हे सांगितलं आहे आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी. त्यांनी संक्रांत स्पेशल गुळपोळीची ही रेसिपी त्यांच्या Kanchan Bapat recipes या यु ट्यूब चॅनलवर शेअर केली आहे.
कशी करायची संक्रांत स्पेशल गुळपोळी?
How to make til gul poli?
- सगळ्यात आधी १ वाटी तीळ कढईत भाजून घ्या. त्यानंतर पाव वाटी खसखस आणि पाववाटी खोबऱ्याचा किस वेगवेगळा करून कढईत भाजा. त्यानंतर कढईत २ टेबलस्पून तेल टाका. त्यात पाव वाटी बेसन पीठ टाका आणि ते तेलात चांगलं परतून घ्या.
- यानंतर परतून घेतलेले बेसन पीठ, भाजलेले तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये टाका. त्यात अर्धी वाटी दाण्याचा कुट, १ टीस्पून जायफळ पावडर, थोडीशी विलायची टाका आणि हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. यानंतर मिक्सरमध्ये पावशेर गुळ टाका आणि ते देखील मिक्सरमधून बारीक करून घ्या. हे झालं आपल्या तिळगुळाच्या पोळीचं सारण तयार.
- आता पोळीसाठी कणिक भिजवून घ्या. त्यासाठी एक कप कणिक, १ कप मैदा आणि त्यात चिमुटभर मीठ टाका. थोड तूप टाका आणि गरजेनुसार पाणी टाकून कणिक मळून घ्या.
- कणिक छान मऊसर मळली की त्याचा एक लहान गोळा घ्या. सारण भरण्यासाठी हातानेच त्या गोळ्याला मध्यभागी खोलगट करा. खोलगट भागात सारणाचा गोळा टाकून तो सगळीकडून पॅक करून घ्या.
- आता या गोळ्याला पीठ लावा आणि पोळपाटावर ठेवून पोळी लाटा. लाटलेली पोळी तव्यावर टाकून खरपूस भाजून घ्या. त्यावरून साजुक तूपाची धार सोडा आणि गरमागरम तिळगुळाची पोळी खाण्याचा आनंद घ्या.