संध्याकाळी चहाबरोबर एखाद्या दिवशी तळलेले पदार्थ खाणे ठीक वाटतं. पण रोजच तेलकट पदार्थ खाल्ले तर तब्येतही बिघडेल आणि वजनही वाढेल. त्यामुळे संध्याकाळी काहीतरी हलकं फुलकं पण चविष्ट हवं. त्यासाठी ढोकळा आहे ना. नेहमीचा ढोकळा नको वाटत असेल तर वेगळ्या प्रकारचा ढोकळा आहेच की . आता तर ढोकळ्याचे रवा ढोकळा, नागली ढोकळा, तांदळाचा ढोकळा असे कितीतरी प्रकार आहेत. पण त्यापेक्षाही वेगळा आणि चटपटीत ढोकळा खायचा असेल तर मसाला ढोकळा हा पर्याय आहे. हा ढोकळा झटपट बनतो. वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतो. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानांनाही आवडेल असा हा मसाला ढोकळा. बनवायचा कसा? ही घ्या रेसीपी.
Image: Google
मसाला ढोकळा कसा करणार?
मसाला ढोकळा करण्यासाठी 1 कप बेसन, पाव कप रवा, पाव चमाचा फ्रूट सॉल्ट, कोथिंबीर, 6-7 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा लाल तिखट, 2-3 चमचे टमाटा केचप, 1 कप बारीक चिरलेल्या भाज्या ( सिमला, गाजर, घेवडा), 3 कप पाणी आणि मीठ घ्यावं.
Image: Google
मसाला ढोकळा करताना एका मोठ्या भांड्यात रवा, बेसन, मीठ आणि पाणी एकत्र करावं. ते चांगलं घोळून घ्यावं. थोडा वेळ ते झाकून ठेवावं. पंधरा मिनिटंनी त्यात चवीपुरतं मीठ घालावं. मीठ मिसळल्यावर आवश्यक वाटल्यास त्यात थोडं पाणी घालावं. ढोकळ्याच्या साच्याला तेल लावून चोपडं करुन घ्यावं. ढोकळ्याचं मिश्रण साच्यात घालावं. ढोकळा 15 मिनिटं मोठ्या आचेवर वाफवावा. एका कढईत तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी घालावी. मोहरी तडतडली की त्यात तिखट आणि टोमॅटो सॉस घालावं.त्यात भाज्या घालून त्या एक दोन मिनिटं चांगल्या परतून घ्याव्यात. मिनिटभर वाफवून मऊ करुन घ्याव्यात. नंतर या भाज्यांमधे वाफवलेला ढोकळा घालून तो हलक्या हातानं भाज्यांमधे मिसळून घ्यावा. वरुन कोथिंबीर भुरभुरावी. असा मसाला ढोकळा संध्याकाळी चहासोबतच नाही तर सकाळी नाश्त्यालाही मजा आणतो. करुन पाहा, खाऊन पाहा!