Join us  

हिरव्यागार टप्पोर्‍या ताज्या मटारचा चविष्ट पराठा, थंडीत दणकून खा; टेस्ट भी -सेहदभी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 5:43 PM

How To Make Matar Paratha: थंडीत नाश्त्याला मटार पराठा खाणं केवळ चविष्टच नाहीतर आरोग्यास फायदेशीर मानला जातो. कारण मटारचे पराठे करताना यातील दाण्यांवर कमी प्रक्रिया होऊन त्याच्या नैसर्गिक रुपात ते पोटात जातात. असे पराठे खाल्ले की पोट भरतं आणि भरपूर वेळ भरलेल राहातं.

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी चविष्ट मटारचा पराठा खाणं फार फायदेशीर आहे.मटारचे दाणे फ्राय करुन न वाटता ते उकडून वाटावेत.पौष्टिक पराठ्यांसाठी कणकेत अजिबात मैदा मिसळू नये.

How To Make Matar Paratha: हिवाळ्यात बाजारात मटार भरपूर मिळतात. या ताज्या कोवळ्या मटारच्या दाण्यांची चव आणि त्यांची गुणवत्ता उत्तम असते. आरोग्याच्या दृष्टीनेही फ्रोझन मटार पेक्षा हिरवे ताजे मटार महत्त्वाचे मानले जातात. म्हणून या काळात मटारचा समावेश आहारात करुन त्याचा फायदा आरोग्यास करुन घेणं महत्त्वाचं ठरतं. हिरवे मटार विविध पध्दतीने आहारात समाविष्ट करता येतात. मटारची उसळ, आमटी, मटार पनीर सारख्या भाज्यांच्या स्वरुपात मटार खाण्याची पध्दत आहेच. पण थंडीत नाश्त्याला मटार पराठा खाणं केवळ चविष्टच नाहीतर आरोग्यास फायदेशीर मानला जातो. कारण मटारचे पराठे करताना यातील दाण्यांवर कमी प्रक्रिया होऊन त्याच्या नैसर्गिक रुपात ते पोटात जातात. असे पराठे खाल्ले की पोट भरतं आणि भरपूर वेळ भरलेल राहातं.

Image: Google

हिवाळ्यात अधून मधून नाश्त्याला किंवा जेवणाला मटारचे पराठे खाल्ल्यास मटारमधील पौष्टिक गुणधर्मांचा फायदा आरोग्यास मिळतो. ताज्या मटारमधे ब, क, के जीवनसत्त्वं, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे खनिजं असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मटारच्या दाण्यात फायबर जास्त असल्यानं पोट भरलेलं राहातं. त्यामुळे अति खाणं टाळलं जाऊन वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित ठेवण्यास ते मदत करतात. मटारमधील फायबरचा उपयोग पचन क्रियेस होतो. पचन क्रिया सुधारते आणि बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

मटारचा पराठा खाण्याचा फायदा हाडांना होतो. कारण मटारमधे के जीवनसत्त्व असतात. हे के जीवनसत्त्वं हाडांच्या चयापचय सुधारण्याचं काम करतात. हाडांची चयापचय क्रिया सतत सुरु राहाणं आवश्यक असतं. कारण या क्रियेत हाडांमधील जुन्या पेशींची जागा नवीन पेशी घेतात आणि हाडं उत्तम स्थितीत राहातात. अपघात होऊन हाडं फ्रॅक्चर झाल्यास हाडं लवकर बरं करण्यात या के जीवनसत्त्वाची भूमिका मोठी ठरते.

मटारच्या दाण्यात प्रथिनं भरपूर असतात. त्यामुळे शाकाहारींसाठी मटार पराठ्यांच्या स्वरुपात पोटात गेल्यास त्याचा फायदा आरोग्य निरोगी राहाण्यास होतो. म्हणूनच हिवाळ्यात मटारचे पराठे मनसोक्त खा आणि फिट राहा. मटारचे पराठे उत्तम करण्याची रेसिपी माहित असणंही गरजेचं आहे.

Image: Google

मटारचे पराठे कसे करणार?

मटारचे पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ, तेल, मीठ, मटारचे दाणे, हिरवी मिरची, लाल तिखट, किसलेलं आलं, धने पावडर आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर एवढी सामग्री घ्यावी.पराठा करण्यासाठी आधी पराठ्यांसाठीचं पीठ मळून घ्यावं. यासाठी कणकेत मीठ आणि थोडं तेल घालून कणिक कोमट पाण्यानं मळून घ्यावी. पराठ्यांसाठीचं पीठ मऊ मळावं. पीठ मळून ठेवलं की ते 15-20 मिनिटं मुरु द्यावं. त्यासाठी ते झाकून ठेवावं.

Image: Google

सारणासाठी मटारच्या शेंगा सोलून दाणे पाण्यात थोडे नरम होईपर्यंत उकळून घ्यावेत. मटार दाणे नरम झाले की त्यातील पाणी काढून ते थंड होवू द्यावेत. थंड झालेले मटार दाणे मिक्सरमधून ओबडधोबड वाटावेत. वाटलेल्या मटारच्या दाण्यात हिरवी मिरची अगदी बारीक कापून घालावी. एक इंच आलं किसून घालावं. लाल तिखट, धने पावडर घालावी. चवीनुसार आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालावा आणि मीठ घालावं. हे सारण चांगलं मिसळून घ्यावं.

सारणात मूठभर कोथिंबीर चिरुन घालावी. भरुन पराठे करतो त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन त्यात सारण भरुन पराठा कोरडं पीठ लावून लाटून घ्यावा. गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी थोडं थोडं तेल लावून सोनेरी रंगावर शेकून घ्याव. ओलं खोबरं-कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीसोबत हा खुशखुशीत आणि पौष्टिक पराठ्याचा आस्वाद घ्यावा.

टॅग्स :अन्नआहार योजना