How To Make Methi Chhole: थंडीत दुपारी जेवलं की आणखीनच थंडी वाजायला लागते. शिवाय चटपटीत आणि चमचमीत असं काहीतरी अजून खावं असं वाटतं. यासाठी मेथी छोले ही उत्तम भाजी आहे. दुपारच्या जेवणात गरम गरम मेथी छोलेची भाजी आणि सोबत पोळी किंवा बाजरीची भाकरी. तोंडाला चवही येईल आणि थंडीही जाईल पळून. छोले आणि मेथी हे एकत्र खाण्याची मजा वेगळीच आहे.
Image: Google
कसे करावेत मेथी छोले?
मेथी छोले करण्यासाठी दिड कप छोले, थोडं काळं मीठ, 1 मोठा कांदा, 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 2-3 मध्यम आकाराचे टमाटे, हिरवी मिरची, लाल तिखट, थोडी दालचिनी पावडर, 1 मोठी वेलची, 2 वेलदोडे, 2-3 लवंगा, 1 तमालपत्रं, 2 कप चिरलेली मेथी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला , 1 छोटा चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा बडिशेप पावडर, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, चिमूटभर हिंग , 3-4 मोठे चमचे तेल, 2 मोठे चमचे दही, 1 ते दिड कप पाणी, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
Image: Google
मेथी छोले करताना सर्वात आधी छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. दुसर्या दिवशी प्रेशर कुकरमधे छोले पाणी आणि काळं मीठ घालून शिजवून घ्यावेत. लसूण, आलं, कांदा मिक्सरमधून वाटून घ्यावा. हे आधी भाजून नंतर वाटलं तरी चालतं. दोन्ही पध्दतीची चव थोडी वेगळी लागते. नंतर टमाटे आणि हिरवी मिरची एकत्र वाटावी.
कढईत तेल गरम करुन घ्यावं. त्यात सर्व अख्खे मसाले एक एक करुन टाकून परतून घ्यावेत. नंतर यात कांदा लसणाची पेस्ट घालावी. रंग बदलेपर्यंत ती परतावी. नंतर यात टमाटा प्युरी आणि दही घालावं. ते मिसळून घेतल्यावर त्यात हिंग, हळद, लाल तिखट, धने पावडर , बडिशेप पावडर आणि गरम मसाला एक एक करुन घालावा. ते चांगलं परतून घेतलं की त्यात चिरलेली मेथी घालावी. तेल सुटेपर्यंत मेथी परतून घ्यावी. उकडलेले छोले घालावेत. ते नीट मिसळले गेले की त्यात थोडं गरम पाणी घालावं. पाण्याला उकळी आली की मीठ घालावं.
Image: Google
रस्सा घट्ट होईपर्यंत भाजी उकळावी. रस्सा घट्ट करण्यासाठी भाजीतले थोडे छोले काढूने ते मिक्सरमधे वाटून भाजीला लावावे. रस्सा दाटसर व्हायला आला की त्यात आमचूर पावडर घालावी. पुन्हा भाजी थोडी उकळावी. गॅस बंद करुन भाजीवर चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. हे मेथी छोले भटुरे, पोळी, भाकरी किंवा गरम गरम भातासोबतही छान लागतात.