हिवाळ्यात कोणत्याही वेळी गरम गरम पराठे खाण्यास मजा येते. पण पराठे म्हटलं की कोबी, बटाटा याच भाज्या समोर येतात. याचे पराठे करायचे म्हटलं तर ते करायलाही वेळ लागतो. शिवाय कधी भाज्या उपलब्ध असतातच असं नाही. घरात कुठली भाजी नसली तरी कांदा हा असतोच. तेव्हा पराठे खायचे आहेत आणि घरात भाज्या नाही म्हणून प्लॅन रद्द करण्याचं कारण नाही. कारण कांद्याचे पराठेही इतर पराठ्यांच्या तोडीस तोड होतात. शिवाय करायला सोपे आणि अगदी चविष्ट. सकाळच्या चहासोबत कांद्याचा पराठा आणि चटणी किंवा दुपारच्या जेवणात पोटभर कांद्याचे पराठे केले तरी चालतं. तेव्हा यंदाच्या थंडीत कांद्याचा पराठा आधी खाऊन पाहा. वेळखाऊ पराठ्यांना नक्कीच झटपट पराठ्याचा परफेक्ट पर्याय सापडेल.
Image: Google
कांद्याचे पराठे कसे कराल?
कांद्याचे पराठे करण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, 2 कप चिरलेला किंवा किसलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा भाजलेल्या जिर्यांची पावडर, पाव चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा कोथिंबीर , चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल घ्यावं.
Image: Google
कांद्याचे पराठे करताना सर्वात आधी एका भांड्यात कणिक घ्यावी. त्यात चिरलेला कांदा, बारीक केलेली हिरवी मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ , जिरे पावडर, चाट मसाला, कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालत पीठ मऊसर मळून घ्यावं. पिठाला तेल लावून 15 मिनिटं झाकून ठेवावं. नंतर पिठाच्या लाट्या करुन त्याला कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यावा. पराठा हा जाडसरच लाटावा. तवा आधी गरम करावा. तो तापला की तव्याला थोडं तेल लावावं आणि मग पराठा शेकण्यासाठी तव्यावर घालावा. पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. हा पराठा दही किंवा रायत्यासोबत छान लागतो.