पनीर म्हणजे फुल्ल ऑफ प्रोटीन्स... शाकाहारी जेवणात पनीर इतका protein rich पदार्थ नसतो, असं म्हंटलं जातं. शिवाय पनीर म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ. पनीरचे स्टार्टर्स आणि पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या म्हणजे मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच आवडीच्या. एकतर पौष्टिक पदार्थ आणि दुसरा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा. त्यामुळे पनीरची कोणतीही डिश हॉटेलमध्ये ऑर्डर केली, तर हमखास इतर पदार्थांपेक्षा त्याची किंमत जास्तच असते. एवढे हेल्दी आणि महागडे पनीर घरी मात्र अगदी चटकन बनविता येते बरं का....
एरवी तुम्ही खास दूध आणून त्याचे पनीर बनवू शकता. पण जर काही कारणाने दूध नासले किंवा फाटले असेल, तर त्याचा सगळ्यात उत्तम उपयोग म्हणजे त्यापासून पनीर बनविणे. घरच्याघरी पनीर बनवायला विशेष काहीच मेहनत घ्यावी लागत नाही. शिवाय कमी वेळेत पनीर तयार होते.
पनीर बनविण्यासाठी लागणारे साहित्यदूध, लिंबू , कॉर्नफ्लॉवर
कसे बनवायचे पनीर१. सगळ्यात आधी तर नासलेले दूध गॅसवर उकळायला ठेवा.२. चांगल्या दूधपासून पनीर बनवायचे असेल तरीही दूध उकळून घ्या.३. नासलेले किंवा चांगले कोणतेही दूध वापरत असाल तरी दूधाला उकळी आल्यावर त्यामध्ये एक लिंबू पिळा. साधारण एक लीटर दूधासाठी १ लिंबू वापरावे.४. लिंबू पिळल्यानंतर आणखी काही मिनिटे दूध उकळू द्या. जेव्हा दुधातले पाणी आणि पांढरा घट्ट भाग स्पष्टपणे वेगळा दिसू लागेल तेव्हा गॅस बंद करा.
५. यानंतर ५ मिनिटे दूध थंड होऊ द्या आणि त्यानंतर एका स्वच्छ सुती कपड्यामधून गाळून घ्या. यामुळे आता पाणी आणि घट्ट दुधाचा लोण्यासारखा झालेला गोळा वेगवेगळा होईल.६. गोळा झालेल्या दूधावर थंड पाणी टाका आणि ते स्वच्छ धुवून घ्या. यामुळे पनीरला लिंबाचा वास येणार नाही. यानंतर या दुधात पाण्याचा थेंब राहणार नाही, याची काळजी घ्यावी. हवे तर पुन्हा कपड्याने गाळून घ्यावे.७. आता या दुधाच्या गोळ्यामध्ये एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाका आणि ते व्यवस्थित कालवून घ्या. सुती कापडात हा गोळा थोडा पसरवून ठेवा आणि त्यावर एखादे ताट झाका. ताटावर काहीतरी ओझे ठेवा. जेणेकरून पनीर दबले जाईल आणि व्यवस्थित सेट होईल.८. १० ते १२ मिनिटांत पनीर थंड होऊन खाण्याजोगे होईल. तुम्हाला हवे तसे त्याचे बारीक काप करून घ्या आणि एखादी मस्त रेसिपी तयार करा.
पनीर खाण्याचे फायदे१. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रोटिन्स मिळविण्याचा चांगला स्त्रोत आहे.२. पनीरमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पनीर दात व हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरते.३. पनीरमध्ये असलेल्या फॅटी ॲसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते.४. पनीरमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे एखाद्या अशक्त व्यक्तीला पनीर खायला दिल्यास अधिक फायदा होऊ शकतो.