शुभा प्रभू साटम
केरळी व्हेज इशट्यू/टयू/नारळ दुधातील भाजी रस्सा हा केरळ मधील एक खास पदार्थ आहे.घट्ट नारळ दुधात वेगवेगळ्या भाज्या शिजवून हा इशट्यु होतो. खरं तर मूळ रस्सा कमी तिखट असतो पण आपण चवीनुसार तिखट वाढवू शकतो. बाजारात भाज्या उत्तम मिळाल्या की त्याचा फायदा घेऊन हा पदार्थ करावा. चवीला उत्तम, पौष्टिक आणि खाण्यात सुखच सुख.
साहित्य
मटर+गाजर +फ्लॉवर +फरसबी +बटाटा जशा आवडतात त्या प्रमाणात,(तुम्ही कुठलीही भाजी वगळू अथवा वाढवू शकता,चौकोनी छोटे तुकडे करून,) - 1 मोठी वाटी.
नारळ दूध घट्ट -1 वाटी.
नारळ दूध पातळ -1 वाटी.
काजू -5 ते 6 नग.
खसखस-2 च चमचे भिजवून.
दालचिनी +लवंग (2ते 3) ,वेलची(2ते 3).
हिरवी मिरची -चवीनुसार. तिखट हवे तर प्रमाण वाढवावे.
आले थोडे.
छोटे कांदे (ऐच्छिक)-5 ते 6 सोलून.
आवडत असल्यास खोबरेल तेल अथवा साधे तेल
फोडणीसाठी कढीलिंब +तमालपत्र.
कृती:
भिजवलेली खसखस ,मिरची,आले,काजू,आणि लवंग, दालचिनी,वेलची सर्व एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे.
मिश्रण घट्ट हवे.
खोल भांड्यात तेल गरम करावे,त्यात तमालपत्र आणि कढीलिंब घालून तडतडू द्यावे, त्यात कांदे घालून लालसर करावे.
त्यात भाज्या घालून, परतून, थोडे पाणी घालून बोटचेपे शिजवून घ्यावे,नंतर पातळ नारळ दूध घालून खसखस +काजू वाटण घालावे. मीठ आणि किंचित साखर घालावी. आच मंद असावी.
साधारण उकळी आली की घट्ट दूध घालावे, मंद उकळी आली की गॅसवरून काढावे. फार उकळू नये.
सौम्य असा हा स्टयू निर डोसे, भात, किंवा इडली यांच्यासोबत उत्कृष्ट लागतो. यात हळद आणि लाल तिखट घालायचे नाही. तिखट आवडीनुसार कमी अधिक करू शकता.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)