शुभा प्रभू साटम
आपल्याला आवडणारे अनेक पदार्थ खूप सोपे वाटतात, विशेषतः आई अथवा आजी करतात तेव्हा ! त्यात काय, इतके साधे तर आहेत. पण अनेकदा हे साधेच पदार्थ जमत नाहीत. त्यातलीच एक आपली साबुदाणा खिचडी. दाणा दाणा मोकळी असणारी, लुसलुशीत, शेंगदाणा कुटाने खमंग खिचडी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. आता होते काय की अशी खिचडी आवडते पण जमत नाही. म्हणजे काहीतरी खटकते, चुकते. कधी लगदा-गोळा होता, कधी चामट, कधी वातड.
वास्तविक साबुदाणा भिजवला, आणि फोडणीत शिजवला. इतके सोपे आहे मग चुकते कुठे?
साबुदाणा व्यवस्थित भिजणे महत्वाचे. ते ठीक असेल तर, शिजवताना आच समान असणे गरजेचे. कूट आणि साबुदाणे यांचे प्रमाण जुळायला हवे. अनेक गोष्टी असतात. त्या जमल्या तर साबुदाणा खिचडी उत्तमच होते.
तर ती उत्तम व्हावी यासाठी करायचं काय?
१. चांगली साबुदाणा खिचडी करायची तर साबुदाणा परफेक्ट भिजणे हा एक मुख्य टप्पा. पण त्याआधी एक पायरी आहे ती महत्त्वाची. साबुदाणा आणल्यावर, मंद आचेवर, थोडावेळ भाजला तर सुरेख भिजून येतो. साबुदाणा मोठ्या कढईत ५/७ मिनिटे भाजून पूर्ण गार होवू द्यायचा. किंचित जरी गरम राहिला तरी गिजका होतो
२. पूर्ण गार साबुदाणा त्याचे पांढरे पाणी जाईतो, स्वच्छ धुवून घ्यायचा.
३. अगदी अंगाबरोबरच्या पाण्यात भिजवायचा. आणि तो परातीत भिजवायचा, की त्याला फैलावयला जागा मिळते.
४. जितका साबुदाणा तितका शेंगदाणा, हे सर्व सामान्य प्रमाण असते. आवडीने कमी जास्त केले तरी चालते. आता कूट कुठे भरड आवडते, कुठे अख्खे दाणे घातले जातात. पण मोकळ्या खीचडीसाठी जरा कमी भरड कूट असावे, तर ते खिचडीत मिळून येते. तर असे कूट साबुदाण्याला व्यवस्थित लावावे.
५ आता फोडणी. तूप कमी असू द्यावे. जिरे+किसलेले आले(उपासालाचालत असल्यास)+ मिरच्या तुकडे, तडतडू देवून मग बटाटा घालावा. कोणी कच्चा घेतो, कोणी उकडून. आवडेल तसा घ्यावा.
६. काही जागी लाल तिखट वापरतात. मिरच्याऐवजी ते घ्यावे. खाताना मिरची तुकडे तोंडात यायला नको, तर आले मिरची वाटून साबुदाण्याला फासू शकता. तसेच अख्खे शेंगदाणे आवडत असल्यास, या टप्प्यावर परतून घालू शकता.
७. बटाटा परतला गेला, की साबुदाणा +कूट+मीठ+किंचित साखर घालून, अगदी मंद आचेवर सतत परतत राहावे. झाकण बिलकुल ठेवू नये. पाच ते सात मिनिटात,रंग बदलून थोडा तपकिरी होतो. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर तवा गरम करत ठेवावा. आता त्या तव्यावर खिचडी भांडे/कढई ठेवून ,व्यवस्थित ढवळून झाकण ठेवून एक वाफ काढावी. तवा का? तर साबुदाणा शिजलाय. परत तो झाकण ठेवून शिजवला तर थेट आच लागून, गिच्च गोळा होईल. तवा असल्याने ते होत नाही.
८. साबुदाण्याची ,मोकळी, मऊशार, खमंग, खिचडी तयार आहे. समजा जास्त प्रमाणत करायची असेल, तर थोडी थोडी करून शिजवावी.
९. खिचडी साठी मोकळे आणि जाड बुडाचे भांडे हवे. ती परतायला बरी पडते. सर्वात महत्वाचे, तूप बेताचे असावे नाहीतर नंतर घशाशी येते.
१०. ताटलीत देतेवेळीच ओले खोबरे शिवरावे. थेट खिचडीत टाकायचे नाही. त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. अशी खिचडी प्लेटभर खावून मन भरत नाही हे नक्की.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)