पिझ्झा या इटालियन पदार्थाला आपण भारतीयांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. लहान मुलांसकट त्यांचे आई- बाबा आणि काही प्रमाणात आजी- आजोबाही या पिझ्झाचे दिवाने आहेत. पिझ्झा पार्टीही आजकाल खूप रंगते आणि लहान मुलांना तर त्यांच्या वाढदिवसाला हल्ली पिझ्झा पाहिजेच असतो. स्टार्टर म्हणूनही हल्ली अनेकजण पिझ्झा ऑर्डर करतात. पिझ्झाची डिमांड एवढी वाढलेली असताना, पिझ्झा सॉसची ही झटपट होणारी रेसिपी नक्कीच प्रत्येक आईचा ताण हलका करू शकेल.
पिझ्झा आपल्याला खूप आवडत असला तरी हॉटेलमध्ये तो काही पोटभर खाता येत नाही. शिवाय कोरोना कृपेमुळे अनेकजणी पिझ्झा घरीच बनवायला शिकल्या आहेत. मग पिझ्झा जर घरी करतोय तर त्यासाठी लागणारा पिझ्झा सॉस कशाला बरं विकत आणायचा ? म्हणूनच पिझ्झा सॉसची ही झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट लागणारी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. मग बघाच पिझ्झा पार्टीची रंगत कशी वाढत जाते ते..
झटपट बनवा पिझ्झा सॉस
पिझ्झा सॉस बनविण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पाहिजे असतील तेवढे ३- ४ टोमॅटो घ्या. त्याच्या देठाचा जो भाग आहे तो काढून टाका आणि हे सगळे टोमॅटो उकळत्या पाण्यात टाका. यानंतर टोमॅटो जरा मऊ पडले आणि त्याची सालं वेगळी होऊ लागली की टोमॅटो पाण्यातून काढून घ्या.
यानंतर टोमॅटोचे लहान लहान तुकडे करा आणि जास्तीचे पाणी काढून टाका. यानंतर टोमॅटोचे तुकडे, लसूणाच्या पाकळ्या, गार्लिक पावडर, थोडेसे तिखट, ओरिगॅनो, पिझ्झा सिझनिंग आणि मीठ हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिक्सरमधून काढताना वरून पुन्हा पाणी घालू नये. हा पिझ्झा सॉस एअर टाईट बाटलीमध्ये ठेवल्यास ७ ते ८ दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता.