रोज रोज काय नवं करायचं आणि भाज्या तरी किती बदलून बदलून करायच्या.. असा प्रश्न घरातल्या महिलांना नेहमीच पडतो. बरं त्याच त्याच पद्धतीच्या रुटीन भाज्या खायला घरातले सगळेही नाक मुरडतात. सारखं काहीतरी टेस्ट बदलून हवं असतं... बरं असं झणकेदार, तोंडाला चव आणणारं काही करायचं असेल, तर त्यासाठी घरातल्या बाईला मेहनतही खूप घ्यावी लागते. तेवढा वेळ देणं सगळ्यांनाच जमेल असंही नाही. म्हणूनच तर झकास, चवदार भाजी करून घरातल्या मंडळींना खुश करण्यासाठी करून बघा ही सोपी रेसिपी (How to make roasted onion and tomato sabji in marathi)....
कांदा टोमॅटोचीच (tomato and onion) तर भाजी, त्यात काय नविन असं वाटत असेल, तर तुम्ही चुकताय.. कारण नेहमीच्या कांदा- टोमॅटो भाजीत आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेत असतो. ते आता या भाजीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यामुळे या भाजीला येणारा स्मोकी ॲरोमा तुम्हाला थेट ढाबा स्टाईल टोमॅटो चटणीची आठवण करून देणारा आहे. भाजी ढाबा स्टाईल चवीची, चमचमीत तर होतेच पण याशिवाय ही भाजी करायला खूपच कमी मेहनत घ्यावी लागते आणि चटकन भाजी तयार होते. त्यामुळे काहीतरी वेगळं खावं वाटलं तर किंवा घरात कांदा- टोमॅटोशिवाय दुसरी कोणतीच भाजी नसली तर ही भाजी नक्की करून बघा. या भाजीची रेसिपी zayka ka tadka या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.
कशी करायची भाजी?
How to make roasted onion and tomato sabji?
- ही भाजी करण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो हे सारख्याच प्रमाणात लागणार आहेत. याशिवाय तेल, आलं- लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिरवी मिरची, धनेपुड, जिरेपुड, गरम मसाला, कसूरी मेथी, हळद, मोहरी, जिरे हे साहित्य लागणार आहे.
- ही भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी कांदा- टोमॅटो गॅसवर ठेवून अख्खे भाजून घ्या.
- पापड भाजायची जाळी गॅसवर ठेवून त्यावर कांदा- टोमॅटो ठेवले तरी चालेल. भाजण्यापुर्वी कांद्याची खालची, वरची देठे काढून घ्या.
- कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर त्याचे बाहेरचे काळे पडलेले आवरण काढून टाका.
- यानंतर कढईत तेल टाका. तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी टाका.
video credit- zayka ka tadka
- फोडणी तडतडल्यावर थोडी हळद आणि अद्रक लसून पेस्ट टाका. त्यानंतर त्यात थोडी कढीपत्त्याची पाने टाका.
- आता त्यामध्ये भाजलेल्या टोमॅटोच्या कापलेल्या फोडी टाका. या फोडी मध्यम आकाराच्या असाव्यात. खूप लहान करू नयेत नाहीतर भाजी गचका होईल.
- त्यानंतर टोमॅटोला तेल सुटू लागल्यावर त्यात कांद्याच्या फोडी टाका.
- यामध्ये आवडीनुसार तिखट, मीठ, गरम मसाला, जिरेपुड, धनेपुड, कसूरी मेथी असं सगळं साहित्य टाका.
- भाजी व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करण्याच्या २ ते ३ मिनिट आधी बारिक चिरलेली कोथिंबीर टाका.
- गरमागरम ढाबा स्टाईल भाजी झाली तयार. या भाजीमध्ये चिंचेचा कोळ, लिंबाचा रस देखील वापरला गेला आहे. आवडत असेल तर टाकावा. किंवा नाही टाकला तरी चालतो.