आंबट-गोड-तिखट अशा मिश्र चवीचे मऊ मुलायम दहीवडे खाण्यास किती मजा येते, पण तसेच दही वडे घरी करायचे म्हटलं तर ते मात्र कडकधोड होतात. हे असं का होतं? मऊ मुलायम दही वडे करण्यासाठी काय करावं लागतं? खरंतर उत्तम चवीचे, छान मऊ पोताचे दही वडे करणं अवघड काम नाही त्यासाठी ते कसे करावेत हे फक्त समजून घ्यायला हवं.
Image: Google
दही वडे करण्यासाठी 1 कप उडदाची डाळ, 2 मोठे कप दही, 2 चमचे मीठ, 2 चमचे जिरे पूड, 2 चमचे कोथिंबीर भाजून घेतलेली, पाव चमचा मिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट , 1 छोटा चमचा काळं मीठ , 2 कप पातळ ताक आणि चवीनुसार साखर एवढी सामग्री घ्यावी.
Image: Google
1. आधी उडदाची डाळ 5 ते 6 तास पाण्यात भिजवावी.
2. डाळ उपसून बारीक वाटून घ्यावी. दाळ वाटताना अगदी थोडं पाणी घालावं. वाटलेल्या डाळीचं मिश्रण हे इडलीच्या पिठापेक्षाही घट्ट असावं.
3. वाटलेलं मिश्रण चांगलं फेटावं. ते हातानं किंवा हॅण्ड मिक्सरनं ते हलकं मऊ होईल इतपत फेटावं. या पिठात थोडं मीठ आणि वाटलेले मिरे घालावेत. मिश्रण हातानं चांगलं मिसळून घ्यावं. मिश्रणाचे गोल गोल गोळे करावेत.
Image: Google
4. कढईत तेल गरम करावं. तेल चांगलं तापलं की वडे तळायला सोडावेत.तळताना गॅसची आच मध्यम ठेवावी. वड्यांचा आकार छोटा ठेवावा. मोठ्या आकाराचे वडे आतून कच्चे राहाण्याची शक्यता असते. वडे सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
5. एका भांड्यात ताक घ्यावं. त्यात थोडं मीठ आणि साखर घालून ताक हलवून घ्यावं. तळलेले वडे या ताकात बुडवून ठेवावेत. साधारण अर्धा ते एक तास हे वडे ताकात बुडवून ठेवावेत.
6. एका वाडग्यात दही घ्यावं. दही थोडं पाणी घालून फेटून घ्यावं. जितकं पातळ हवं तितकं त्यात पाणी घालावं. त्यात मीठ, 1 चमचा जिरे पूड , 1 चमचा भाजून घेतलेली कोथिंबीर ,मिरे पूड आणि साखर घालावी. दह्याचं हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यावं. ते थोडावेळ फ्रिजमधे गार होण्यास ठेवावेत.
Image: Google
7. ताकात ठेवलेले वडे दोन्ही हातांनी दाबून त्यातलं पाणी काढून टाकावं. ते वडे एका खोलगट डिशमधे ठेवावेत. वड्यांवर दह्याचं मिश्रण घालावं. या वड्यांवर आता वरुन जिरे पावडर, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट , काळं मीठ आणि चाट मसाला घालावा. दहीवड्याला चांगला स्वाद येण्यासाठी दह्याच्या मिश्रणात साखर घालावी.