सणासुदीला आपल्या हाताने एखादा छान पदार्थ तयार करावा आणि आपल्या कुटूंबाला, प्रेमाच्या माणसांना खाऊ घालावा, आपणही आनंदानं खावा आपल्या मनासाररखा पदार्थ करुन असं वाटतंच. सणासूदीला कितीही घाई असली तरी वेळात वेळ काढून असे पदार्थ केले जातात. ड्रीमगर्ल हेमामालिनीही त्याला अपवाद कशा असतील? हेमा मालिनी यांनी स्वत:च्या हाताने पोंगल करून सण साजरा केला. आईचा हा कित्ता लेकीनेही गिरवला आणि तिच्याही घरी तिने स्वत:च पोंगल तयार केला. दोघी मायलेकींच्या या पोस्ट सोशल मिडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.
कसा साजरा करतात पोंगल सण?
How to celebrate pongal festival?
तमिळ संस्कृतीमध्ये चार दिवस पोंगल सण साजरा होतो. सुर्याचे आभार मानण्यासाठी ते हा सण साजरा करतात. आपल्याकडे भाेगी जेव्हापासून सुरू होते, तिथूनच त्यांचा पोंगल सण सुरू होतो. त्याला ते भोगी पोंगल म्हणतात. तर संक्रांतीच्या दिवसाला ते पोंगल म्हणतात. या दिवशी दक्षिण भारतात फुलं- पानं यांचा वापर करून सगळं घर सुशोभित करण्यात येतं. चुलीवर मातीचे सुशोभित केलेले मडके ठेवले जाते. त्याला बाहेरून हळकुंड बांधतात. घरातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात छोटा सदस्य या मडक्यात दुध आणि तांदूळ टाकतात आणि या शिजवलेल्या भाताचा नैवेद्य देवाला दाखवतात. त्यानंतर घरातले सगळे प्रसाद म्हणून तो खातात.
कसा तयार करतात पारंपरिक पोंगल पदार्थ?
How to make south Indian dish Pongal?
दोन प्रकारचे पोंगल असतात. एक पोंगल गोड असतो तर दुसरा नमकीन.
१. गोड म्हणजेच सकराई पोंगल करण्याची पद्धत (sakarai pongal)
- कुकरमध्ये दोन टेबलस्पून तूप टाका.
- त्यात अर्धी वाटी धुतलेले तांदूळ आणि पाव वाटी धुतलेली मुगाची डाळ टाका. तुपात ते चांगले फ्राय करून घ्या.
- यानंतर त्यात एक वाटी दूध आणि दिड वाटी पाणी टाका. आता कुकरचं झाकण लावा आणि ५ शिट्ट्या करून डाळ- तांदूळ शिजवून घ्या.
- आता गॅसवर पॅन ठेवा. त्यात एक वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी टाका. गुळाचा थोडा घट्ट पाक तयार करा आणि तो आपण केलेल्या भातात टाका. त्यानंतर भात पुन्हा एकदा गॅसवर ठेवून थोडा शिजू द्या.
- आता एका कढईत पाव वाटी तूप टाका. त्यात काजूचे तुकडे आणि मणुके टाकून परतून घ्या. तुपात परतलेले काजू, मणुके तुपासह शिजत असलेल्या भातात टाका. थोडी विलायची पावडर, चिमुटभर कापूर, चुटकीभर मीठ टाका. हे सगळे मिश्रण हलवून घ्या. थोडीशी वाफ आली की झाला सकराई म्हणजेच गोड पोंगल तयार..
२. वेन पोंगल म्हणजेच नमकीन पोंगल रेसिपी (ven pongal recipe)
- यासाठी गोड पोंगलप्रमाणेच डाळ- तांदूळ शिजवून घ्या. फक्त दूध न घालता पाणीच टाका.
- यानंतर कढईत पाव वाटी तूप टाका. त्यात मीरे, जीरे, कढीपत्त्याची पाने, लसूणाचे तुकडे, काजूचे काप टाका आणि चांगले परतून घ्या.
- परतून झाले की ते आपण शिजवलेल्या भातात टाका. चवीनुसार मीठ टाका आणि थोडीशी वाफ येऊ द्या. गरमागरम नमकीन पोंगल झाला तयार..