रताळ्यांची आठवण आपल्याला आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि महाशिवरात्र या तीन मोठ्या उपवासांनाच येते. बाकी बाजारात रताळी असली तरी त्याकडे पाहिलं जात नाही. पण आरोग्यासाठी रताळी हे फायदेशीर असून जेव्हा केव्हा ते बाजारात उपलब्ध असतील तेव्हा ते खायलाच हवेत. थंडीमधे सारखं गोड खावंसं वाटतं. खास थंडीचं निमित्त म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा हलवा करुन खाल्ला जातो. हिवाळ्यात पौष्टिक ठरणाऱ्या हलव्यांच्या यादीत रताळ्यांचा हलवा आवर्जून समाविष्ट करायला हवा. गोड खाण्याची इच्छा तर पूर्ण होतेच शिवाय तो खाल्ल्याने वजन वाढण्याचाही धोका नसतो. पचनास हलका असलेला रताळ्याच्या हलव्यातील पौष्टिकता आणखी वाढवायची असल्यास त्यात साखरेऐवजी गूळ घालावा. रताळ्याचा हलवा करण्यास सामग्री कमी लागते आणि तो होतोही लवकर. हिवाळ्यातली स्पेशल पौष्टिक डिश म्हणून रताळ्याचा हलवा अवश्य करुन पाहा. हा हलवा खाल्ल्यानंतर बाजारात रताळी दिसतील का याचा शोध आपली नजर नक्की घेईल.
Image: Google
रताळ्याचा हलवा कसा करणार?
रताळ्याचा हलवा करणं अतिशय सोपं आहे. घरात रताळी असली की जेव्हा मन होईल तेव्हा हा हलवा करुन खाऊ शकता. रताळ्याचा हलवा करण्यासाठी 5 मध्यम आकाराची रताळी, 1 वाटी गूळ, 4 चमचे साजूक तूप, 3 ते 4 वेलच्यांची पूड, 1 चिमूटभर केशर, 10 ते 12 काजुंचे तुकडे आणि 1 कप दूध किंवा साय एवढी सामग्री घ्यावी.
रताळ्यांचा हलवा करताना सर्वात आधी रताळी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावी. यामुळे रताळ्यांवरची माती निघून जाते. मग रताळी धुवून आणि पुसून घ्यावीत. ती कुकरमधे उकडायला ठेवावीत. बटाट्याप्रमाणे रताळी उकडायला हवीत. उकडलेली रताळी थंड झाली की ती सोलून घ्यावीत आणि चांगली कुस्करुन घ्यावीत.
Image: Google
एका कढईत साजूक तूप घालावं. ते तापलं की त्यात काजू आणि केशर काड्या घालाव्यात. काजू थोडे लालसर परतले गेले की त्यात कुस्करलेली रताळी घालावीत. कुस्करलेली रताळी परतताना एका बाजूला एका भांड्यात थोडं पाणी उकळायला ठेवावं. ते उकळायला लागलं की त्यात गूळ आणि वेलची पावडर घालावी. गूळ पाण्यात विरघळून त्याचा पातळ पाक करुन घ्यावा. रताळ्यांचा रंग बदलायला लागला की त्यात एक कप आधी गरम करुन ठेवलेलं दूध घालावं किंवा साय घालावी. ते रताळ्यात चांगलं मिसळून घ्यावं. नंतर यात गुळाचा पाक घालावा. त्यात वेलची पूड आणि गुळाचा पाक घालावा. गुळाचा पाक घातल्यानंतर तो चांगला हलवून घ्यावा. थोडा वेळ गॅस मंद करुन कढईवर झाकण ठेवावं. जेव्हा गुळाचं पाणी रताळ्याच्या मिश्रणात पूर्णपणे शोषलं जाईल तेव्हा हलवा वरुन थोडं साजूक तूप घालून पुन्हा चांगला परतून घ्यावा. नंतर यात वाटल्यास आणखी आवडीचा सुका मेवा बारीक तुकडे करुन घालावेत. सुका मेवा घालून हलवा पुन्हा झाकून ठेवावा. हा हलवा गरम गरम खावा.
Image: Google
रतळ्याचा हलवा पौष्टिक कसा?
1. रताळी ही गुणानं उष्ण असतात. त्यामुळे हिवाळ्यात रताळ्यांचा हलवा शरीराला हवीहवीशी ऊब देतो.
2. रताळ्यांमधे ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. रताळ्यांमधी प्रथिनांचं प्रमाणही भरपूर असतं. त्यामुळे हिवाळ्यात रताळ्याचा हलवा खाल्ल्यास शरीराला ऊर्जा देखील मिळते. रताळ्यात असलेलं क आणि ब जीवनसत्वं अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतात. रतळ्याच्या हलव्यातील गूळ, साजूक तूप आणि सुकामेव्यामुळे शरीराला मिळणाऱ्या पौष्टिक गुणधर्मांत वाढ होते.
Image: Google
3. डोळ्यांच्या आरोग्यासाठी रताळ्याचा हलवा हा खूपच फाय्देशीर आहे. कारण या हलव्यातून बीटा केरोटीन आणि एंथोसायनिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त घटक मिळतात. शिवाय रताळ्यांमधे अ जीवनसत्त्वं असतं त्यामुळे नजर सुधारण्यास मदत होते.
4. रताळ्यांमधे फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे रताळ्यांचा हलवा हा पचनासही हलका असून तो पचन सुलभ होण्यास मदतच करतो. शिवाय रताळ्यांमधील ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे रताळ्याचा हलवा प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर लगेच वाढत नाही.