सकाळी सकाळी घाई गडबडीत नाश्त्याला करण्यासाठी झटपट होणारा पदार्थ म्हणजे इडली- चटणी (idli chutney recipe). इडलीचं कुकर एकदा लावलं आणि झटपट चटणी बनवली की झाला परफेक्ट हेल्दी ब्रेकफास्ट तय्यार.. पण हा ब्रेकफास्ट तेव्हाच जमून येतो, जेव्हा चटणी चवदार होते... चटणी मिळमिळीत झाली की इडलीची सगळी मजाच जाते. म्हणूनच तर अस्सल साऊथ इंडियन स्टाईलची चटणी करण्यासाठीची ही घ्या रेसिपी. ही रेसिपी शिल्पा रेड्डी यांनी इन्स्टाग्रामच्या daily_recipes_by_silpa या पेजवर शेअर केली आहे. ही चटणी डोसा, उतप्पा, उपमा, पाेंगल या पदार्थांसोबत खाता येते, असंही त्यांनी सांगितलं आहे.
चटणीसाठी लागणारे साहित्य
१ कप शेंगदाणे, १ कप हरबरा डाळ, १ कप नारळाचे काप, ६ ते ७ मिरच्या, चिंचेचा छोटा तुकडा, ४ ते ५ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, तेल, कढीपत्त्याची पाने.
थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ
चटणी तयार करण्याची रेसिपी
How to make chutney for idli?
- सगळ्यात आधी कढईमध्ये एक टेबलस्पून तेल टाका.
- तेल तापलं की त्यात शेंगदाणे आणि हरबरा डाळ टाकून परतून घ्या. डाळीचा रंग बदलला की त्यात नारळाचे काप टाका आणि परतून घ्या.
- यानंतर हिरव्या मिरच्या, चिंचेचा तुकडा, लसूण पाकळ्या टाकून परतून घ्या.
- यानंतर हे सगळे परतलेले साहित्य मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
- आपली चटणी तयार झाली आहे. ती एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि आता त्याला वरून चरचरीत फोडणी द्या
- फोडणी घालण्यासाठी कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यात जीरे टाका. त्यानंतर त्यात थोडी हरबरा डाळ टाका. डाळ परतली की त्यात लसणाचे बारीक काप, कढीपत्ता आणि हिंग टाका.
- ही फोडणी आपल्या चटणीमध्ये टाका. चवीनुसार त्यात मीठ घाला. सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि गरमागरम इडलीसोबत ही स्वादिष्ट चटणी खाण्याचा आनंद घ्या...