Join us  

गारठ्यात ऊब देणारी प्रसादाची सात्विक खिचडी; घरच्या घरी करण्यासाठी ही घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 6:49 PM

How To Make Temple Khichadi: मंदिरात मिळणार्‍या सात्विक खिचडीचा घाट घरी घालायचाय म्हणता? अवघड नाही. फक्त खिचडी लागणारं साहित्य आणि कृती फक्त नीट समजून घ्या. रात्रीच्या गार वातावरणात ताटातली सात्विक खिचडी ऊब देईल आणि चविष्ट मेजवाचं समाधानही.

ठळक मुद्देप्रसादाची सात्विक खिचडी पारंपरिक रितीने करायची तर ती मातीच्या भांड्यात करावी.खिचडीसाठी लागणारे डाळ तांदूळ तासभर तरी भिजायला हवेत.प्रसादाची खिचडी करण्याची पध्दत नेहमीच्या खिचडीपेक्षा वेगळी आहे आणि ही पध्दतच तिच्या विशिष्ट चवीचं खास वैशिष्ट्य आहे.

 सात्विक खिचडीच्या प्रसादाची चव सगळ्यांनाच माहित असते. ही खिचडी इतकी चविष्ट लागते, की एका द्रोणानं मन समाधानी होतच नाही. परत परत अशी खिचडी खावीशी वाटते. मंदिरात मिळणारी ही सात्विक खिचडी घरीही करता येते.

मुळातच खिचडी हा पोषक आहार आहे. त्यातच इस्कॉनसारख्या मंदिरात मिळणार्‍या सात्विक खिचडीचा प्रसाद म्हणजे पौष्टिक आणि चविष्ट. अशी मेजवानी घरी करायची असेल, पाहुणे, मित्रमंडळी यांच्यासोबत अशा सात्विक खिचडीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही अवघड गोष्ट नाही. एकदा या खिचडीची फक्त सामग्री आणि कृती बारकाईनं समजून घ्यावी लागेल इतकंच!

Image: Google

प्रसादाची सात्विक खिचडी कशी कराल?

प्रसादाची सात्विक खिचडी करण्यासाठी अर्धा कप तांदूळ, पाव कप हरभरा डाळ, पाव कप मूग डाळ, 2 तमाल पत्रं, गरजेइतकं पाणी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चक्र फुल, 2 दालचिनीचे तुकडे, गाजर, घेवडा, फ्लॉवर, बटाटे या भाज्या चिरुन आपल्या अंदाजानुसार, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडिशेप, अर्धा चमचा कांद्याचं बी ( कलौंजी) 2 आख्ख्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हिंग आणि 2-3 मोठे चमचे साजूक तूप एवढी सामग्री घ्यावी.

सात्विक खिचडी करताना आधी तासभर डाळी आणि तांदूळ धुवून भिजवून ठेवावे. दोन्ही डाळी वेगवेगळ्या आणि तांदूळ स्वतंत्र भिजवावेत. पारंपरिक पध्दतीने ही खिचडी मातीच्या भांड्यात करतात. आपल्याकडे मातीचं भांडं नसल्यास प्रेशर कुकरमधे किंवा मोठ्या कढईत किंवा पातेल्यात केली तरी चालते.

Image: Google

भांड्यात साधारण सहा कप पाणी गरम करायला ठेवावं. ते पाणी थोडं गरम व्हायला लागलं, की त्यात मीठ आणि हळद घालावी. 2-3 मिनिटांनी भिजवलेली हरभरा डाळ टाकावी आणि शिजू द्यावी. हरभरा डाळ थोडी शिजली की त्यात भिजवलेली मूग डाळ घालावी. 4-5 मिनिटानंतर भिजवलेले तांदूळ घालावेत. तांदूळ घातल्यानंतर डाळ तांदूळ चांगले मिसळून घ्यावेत. नंतर त्यात तमाल पत्रं, चक्र फूल आणि दालचिनी घालावी. हे मसाले घातल्यानंतर 5-6 मिनिटं मिश्रण मंद आचेवर शिजू द्यावं. मग त्यात सर्व भाज्या घालाव्यात आणि चांगल्या मिसळून घ्याव्यात.

भाज्या मिसळल्यानंतर एक दोन मिनिटातच त्यात लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला घालून खिचडीचं मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. मग भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं खिचडी शिजू द्यावी. पण मधून मधून झाकण काढून खिचडी हलवत राहावी.

Image: Google

खिचडी चांगली शिजली की गॅस बंद करावा. दुसर्‍या कढईत साजूक तूप घालावं. तूप तापल्यानंतर त्यात मोहरी, मेथ्या, कांद्याचं बी, बडिशेप आणि जिरे घालावेत. ते फोडणीत परतले की सुक्या लाल मिरच्या घालाव्यात. शेवटी हिंग घालून फोडणी सतत हलवत राहावी. ही फोडणी खिचडीवर घालून ती खिचडीत चांगली मिसळून घ्यावी. ही सात्विक खिचडी वरुन   तूप घालून खावी.