आपल्या भारतीय जेवणाचं वैशिष्ट म्हणजे ताटाची डावी बाजू ही ताटाच्या उजव्या बाजूइतकीच महत्त्वाची. जेवणाला चव आणि चटपटीतपणा आणण्यासाठी या डाव्या बाजूच्या चटणी लोणच्याची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याकडे चटण्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातला एक चटपटीत प्रकार म्हणजे टमाटा कढीपत्त्याची चटपटीत चटणी. ही चटणी हिवाळ्यात ताटात असली की दोन घास जास्तच जातात पण कमी नाही. आणि या चटणीच्या पौष्टिकतेमुळे ही चटणी खाऊन नुकसान नाही तर फायदाच होतो. नुसतं नाव वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर मग हे वाचा आणि चटपटीत चवीची टमाटा कढीपत्ता चटणी लगेच करुन पाहा.
Image: Google
कशी करायची टमाटा कढीपत्त्याची चटणी?
ही चटणी करण्यासाठी 2 कप बारीक चिरलेला टमाटा, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापलेला, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं किसून घेतलेलं. 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून् घेतलेल्या, दिड चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा चिंचेचा कोळ, 2 चमचे गूळ, चवीनुसार मीठ आणि 1-2 मोठे चमचे तेल घ्यावं.
Image: Google
टमाटा कढीपत्त्याची चटणी करताना आधी एका कढईत तेल घेऊन ते गरम करावं. तेल गरम झालं की त्यात जिरे, मोहरी आणि कढी पत्ता घालून ते परतून घ्यावं. हे परतल्यावर त्यात किसलेलं आलं, लसूण घालून ते परतावं. नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा मऊ झाला की त्यात मीठ घालून फोडणी हलवून घ्यावी. मग फोडणीत चिरलेला टमाटा घालावा. त्यानंतर हळद, तिखट घालून टमाटा 3-4 मिनिटं शिजवावा.
Image: Google
टमाटा शिजला की त्यात चिंचेचा कोळ घालावा. चिंचेचा कोळ नीट मिसळून घेतल्यावर त्यात गूळ घालावा. गूळ घातल्यानंतर चटणी अजून कही वेळ शिजू द्यावी. ही चटणी आंबट, गोड, तिखट अशा मिश्र चवीची लागत असल्यानं ती खाण्यास मजा येते. ही चटणी जेवणात असली तर भाजीची गरजचं काय?