असं बऱ्याचदा हाेतं. आपण लाेणचं घातलं की महिनाभरातच लोणच्याच्या वरच्या थरावर बुरशी येऊ लागते. लोणचं घालताना आपल्याकडून कळत नकळत एखादा पदार्थ कमी जास्त प्रमाणात पडतो किंवा मग थोडा निष्काळजीपणा होऊन जातो. त्यामुळे मग लोणच्याला लगेचच बुरशी येऊ लागते. बरणीच्या कोपऱ्यावर थोडी बुरशी दिसली, की आपण लगेच तेवढा भाग काढून टाकतो. पण इथेच तर सगळं चुकतं. फक्त तेवढ्या भागावरची बुरशी काढल्याने उरलेलं सगळं लोणचं सुरक्षित राहतेच असे नाही. बाकीचे लोणचे टिकवायचे असेल, तर त्यावर काही उपाय तातडीने करणे गरजेचे असतात.
बुरशी आली असेल तर ही काळजी घ्या
१. चिनी मातीच्या बरणीतच लोणचं भरा
लोणचं योग्य पद्धतीने मुरण्यासाठी ते चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे जर तुम्ही लोणचं प्लास्टिकच्या बरणीत भरलं असेल, तर ते लगेच काढून घ्या. कारण प्लास्टिकच्या डब्यात लोणचं चांगल्या पद्धतीने मुरत नाही. त्यामुळे त्यावर बुरशी चढू शकते. काचेच्या बरणीपेक्षाही चिनी मातीच्या बरणीत लोणचे ठेवण्यास प्राधान्य द्यावे.
२. लोणच्याची बरणी स्वच्छ सुर्यप्रकाशात ठेवा
लोणच्याची बरणी कधीच कुबट हवेत किंवा अंधाऱ्या जागेत ठेवू नका. ज्या भागात चांगला सुर्यप्रकाश येतो, त्याच ठिकाणी लोणचे ठेवा. लोणच्याची बरणी जर उन्हात ठेवली, तर त्या बरणीत ओलावा शिरणार नाही आणि लोणचे टिकण्यास मदत होईल.
३. मीठ आणि तेल टाका
लोणच्यामध्ये जर मीठ आणि तेलाचे प्रमाण कमी झाले असेल, तरी लोणच्याला बुरशी येऊ शकते. त्यामुळे लोणच्याला जर बुरा येतो आहे, असे लक्षात आले, तर लगेचच लोणच्यात अधिकचे मीठ टाका. तसेच जेवढे लोणचे घातले आहे, त्यानुसार तेल घ्या. तेल आधी कडक तापवून घ्या. तापवताना तेलाला उकळी येणार नाही, याची काळजी घ्यावी. असे कडक तापवलेले तेल थंड करावे आणि मग ते लोणच्यात टाकावे. यामुळेही लोणच्याला बुरशी येणार नाही.
४. लोणच्याच्या बरणीला द्या हिंगाची धुरी
हिंगाची धुरी लोणच्यासाठी खूप चांगली असते. लोणचे बरणीत भरण्यापुर्वी हिंगाची धुरी देणे अधिक चांगले असते. पण जर लोणच्याला बुरशी येत असेल बरणी बदलण्याचा उपाय करून पहा. लोणचे नव्याने ज्या बरणीत भरणार आहात, ती बरणी धुवून स्वच्छ कोरडी करून घ्या. यानंतर थोडेसे हिंग गरम करा. हिंगातून धुर निघायला लागला की ते एका वाटीत भरा. ही वाटी ज्या बरणीत लोणचे ठेवायचे आहे, त्या रिकाम्या बरणीत ठेवा आणि वरून झाकण लावून घ्या. यानंतर ५ मिनिटाने झाकण काढा. बरणीला हिंगाचा छान सुवास लागेल. अशा बरणीत भरलेले लोणचे अधिक काळ टिकते.
५. लोणचे वारंवार हलवा
लाेणचं घातल्यानंतर सुरूवातीला १५ ते २० दिवस लोणचे दररोज हलवावे लागते. यासाठी एकतर स्वच्छ चमच्याचा वापर करावा किंव मग बरणीच हलवत जावी. जर लोणचे हलवलेच नाही, तर त्याला हमखास बुरशी येणार.