आपण नेहमी आपल्या जवळपासच्या किराणा माल विक्रेत्याकडून किंवा अगदी मॉलमधून किराणा सामान खरेदी करतो. हल्ली बऱ्याच प्लॅटफॉर्मवरुन किराणा सामान ऑनलाइन मागवायची सुविधाही उपलब्ध आहे. आता स्थानिक ठिकाणहून सामान आणा नाहीतर ब्रँडेड, त्यात भेसळ असण्याची शक्यता कोणीच नाकारु शकत नाही. अशाप्रकारच्या भेसळीमुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. विशेष म्हणजे हे परिणाम दिर्घकालीनही असू शकतात. साखर हा आपल्या दैनंदिन वापरातला पदार्थ. अगदी चहापासून ते वेगवेगळ्या गोड पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा हा पदार्थ भेसळयुक्त असू शकतो. यामधील थोडीशी भेसळ असली तरी तुम्ही ती अगदी सहज ओळखू शकता. यासाठी घरच्या घरी एक चाचणी करता येते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरीटी ऑफ इंडियाने (FSSAI) याबाबतचा व्हिडियो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून यामध्ये त्यांनी ही भेसळ ओळखण्याची चाचणी सांगितली आहे.
काही वेळा साखरेत युरीयाची भेसळ असू शकते तर काही वेळा इतर काही घटकांची. शरीरात युरीयाची पातळी वाढणे अनेक कारणांसाठी धोक्याचे असते. वाढलेल्या युरीयामुळे शरीरात रासायनिक बदल होतात आणि त्याचा शरीराच्या यकृत, किडनी यांसराख्या अवयवांवर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही भेसळ वेळीच लक्षात येणे गरजेचे असते. चुकीच्या पद्धतीने पैसे कमावण्याच्या हेतुने पदार्थांमध्ये अशाप्रकारची भेसळ केली जाते मात्र त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
पाहूयात कशी ओळखायची भेसळ
१. एका वाटी किंवा ग्लासमध्ये थोडी साखर घ्या २. त्यात पाणी घाला आणि पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहा. ३. यानंतर या मिश्रणाचा वास घ्या४. यामध्ये अमोनियाचा वास आल्यास या साखरेत भेसळ आहे असे समजावे५. मिश्रणाचा वास येत नसेल तर त्यात अमोनिया नाही असे समजून साखर चांगली आहे असे समजावे.
अमोनियाचा वास कसा ओळखायचा ?
अमोनिया हा रंग नसलेला एकप्रकारचा गॅस असून हे नायट्रोजन आणि हायड्रोजनचे संयुग असते. या वायूला लघवी किंवा घाम यासारखा एकप्रकारचा दुर्गंध असतो. हा वायू नैसर्गिकपणे पाणी, माती आणि हवेमध्ये असतो. त्याचप्रमाणे हा वायू वनस्पती, प्राणी आणि माणूस यांसारख्या सजीवांमध्येही असतो.
याआधीही फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस अथॉरीटी ऑफ इंडियाने (FSSAI) मैदा आणि तांदळाचे पीठ, बेसन, काळी मिरीची पूड यांमधील भेसळ ओळखण्याबाबत ग्राहकांना जागरुक केले होते. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी कमीत कमी सामानात आणि सोप्या पद्धतीने विविध पदार्थांमधील भेसळ ओळखू शकता. आरोग्य चांगले राहण्यासाठी अशाप्रकारच्या चाचण्या करणे उपयुक्त ठरु शकते.