खजूर हा सुकामेव्यातला घटक. काळे खजूर, सीडलेस खजूर, ओले खजूर अशा विविध स्वरुपात खजूर मिळतात. खजूर कोणत्याही प्रकारचे असले तरी ते चविष्ट लागतात आणि त्यातून शरीराला जीवनसत्त्वं आणि लोह आणि कॅल्शिअमसारखी महत्त्वाची खनिजं मिळतात. खजूर आणल्यानंतर ते कसे आणि कुठे ठेवायचे हा मुख्य प्रश्न असतो. कारण ते जर नीट ठेवले नाहीत तर खजुरातील ओलेपणा, ताजेपणा निघून जातो. खजूर कोरडे तर होतातच शिवाय त्याची चवही बदलते.
Image: Google
विकत आणलेले खजूर नीट ठेवले नाही आणि त्याकडे फार वेळ दुर्लक्ष झालं तर खजूराला मुंग्या लागतात, बारीक किडे होतात आणि ते खाण्याच्या योग्यतेचे राहात नाही. खजूर हे केवळ थंडीतच खाणं महत्त्वाचं आहे असं नाही. बाराही महिने ते शरीराच्या पोषणासाठी महत्त्वाचे असतात. कोणत्याही प्रकारचे खजूर हे स्वस्त नसतात. मग असे मोलाचे खजूर नीट ठेवणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे.दुकानातून आणलेले खजूर बाहेर, फ्रीजमधे अथवा फ्रीजरमधे ठेवताना काही नियम पाळणं गरजेचे आहेत. ते पाळले तर खजूर दीर्घकाळ ताजे, ओलसर तर राहातातच शिवाय त्याची चव आणि पौष्टिक तत्त्वंही शाबूत राहतात.
Image: Google
खजूर चांगले राहाण्यासाठी कसे ठेवाल?
1. खजूर कधीही उघडे ठेवू नये. बाहेर खजूर ठेवायचे असतील तर काचेच्या बरणीमधे ठेवणं हा चांगला पर्याय आहे. फक्त त्यासाठी ही बरणी स्वच्छ आणि कोरडी असायला हवी. खजूर भरताना बरणीत गच्च भरु नये. त्यामुळेही ते खराब होतात. काचेच्या बरणीत खजूर भरुन ठेवले की बरणीला व्यवस्थित झाकण लावावं. जिथे जास्त प्रकाश, उष्ण हवा लागणार नाही अशा ठिकाणी ती बरणी ठेवली तर खजूर चांगले राहतात. खजूर बरणीतून काढताना हात कोरडे असावेत.
Image: Google
2. काही खजूर वरुन थोडेसे कडक आतून मऊ असतात. असे खजूर आतून मऊ राहिले तरच ते छान मधुर लागतात. नाहीतर ते आतून सुकले की चव देत नाही आणि खराब होण्याचाही धोका असतो. अशा वेळेस खजूर फ्रीजमधे ठेवणं हा आणखी सुरक्षित पर्याय आहे. फ्रीजमधे ठेवताना खजूर एअर टाइट डब्यात ठेवावेत. आपल्याला हवे तेव्हा खजूर काढून डबा नीट लावला आहे ना याची खात्री करुनच पुन्हा फ्रीजमधे ठेवावा. एअर टाइट डब्यासोबतच पुठ्ठ्याच्या खोक्यांमधे ते ठेवले तरी चालतात. खजूर जर आतून नरम असतील तर पंधरा दिवसांपर्यंत त्याचा पोत, रंग, चव सगळं व्यवस्थि राहातं. त्यामुळे ते तेवढ्या काळातच ठेवावेत. यापेक्षा जास्त काळही ते राहू शकतात पण आतून कोरडे होण्याची आणि चव कमी होण्याची शक्यता असते.
Image: Google
3. खजूर जर सहा महिने फ्रीजमधे चांगले राहावे असं वाटत असेल तर ते एका काचेच्या बरणीत भरावेत आणि बरणीचं तोंड ब्लोटिंग पेपरनं बंद करावं. ओलसर असलेले खजूर फ्रीजमधे टिकतात पण ते काही काळानं सुकतातच. फ्रीजमधे जास्त काळासाठी खजूर ठेवायचे असतील तर कोरडे खजूर हा प्रकार घ्यावा. सुकामेवा फ्रीजमधे ठेवण्यासाठी फ्रीजर बॅग मिळतात, झिप लॉक पिशव्या मिळतात त्या वापरल्या आणि त्या नीट बंद करुन ठेवल्या तर खजूर छान राहातात. फ्रीजरमधे एअर टाइट कंटेनरमधे खजूर ठेवता येतात. फक्त ते घेऊन झाल्यावर कंटनेर बंद करण्याआधी कंटेनरमधील खजूर वरखाली करावेत. त्यामुळे खजूर चांगले राहातात.