सध्या कोणतही छोटेखानी फंक्शन असो किंवा पार्टी, सण समारंभ असला की आपण छोटासा केक आणून सेलिब्रेट करतोच. अशा छोट्या छोट्या सेलिब्रेशन्सचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हल्ली केक कापण्याचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. केक असा पदार्थ आहे की घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच फार आवडतो. घरातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस यासारख्या खास क्षणांसाठी केक आणला जातो. बरेच फंक्शन केकशिवाय अधुरेच आहेत. दर महिन्याला काही ना काही प्रसंग असा येतोच की आपण केक आणतो. यासाठी जर आपण घरीच केक तयार केला तर असा विचार आपल्या डोक्यांत येतो. घरी केक करायचा म्हटलं की त्यासाठी फार वेळ आणि खूप मोठा घाट घालावा लागतो.
केक अगदी बरोबर जमला तर त्या समाधानानेच अर्ध पोट भरत. तो जर नीट जमला नाही तर केक बिघडला म्हणूनच हिरमोड होतो. त्याचबरोबर ज्या प्रसंगासाठी केक करण्याचा घाट घातलेला असतो त्यातला आनंदच निघून जातो. केक खाताना छान हलका-फुलका लागला की केक करताना केलेले सर्वच कष्ट अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटत. केक न बिघडता परफेक्ट फुलून येण्यासाठी सुप्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी सांगितलेल्या काही टीप्स लक्षात ठेवू(How To Bake A Perfect Sponge Cake Tips & Tricks).
नक्की काय करता येऊ शकत?
१. केक टिन मध्ये केकचे बॅटर ओतण्याआधी त्या केक टिनच्या पृष्ठभागाच्या आकारा एवढा बटर पेपर कापून घ्यावा. त्यानंतर केक टिनच्या आतील भागात थोडे तेल ओतून ब्रशच्या मदतीने ते सर्वत्र पसरवून घ्यावे. आता केक टिनच्या आतील पृष्ठ भागावर १ टेबलस्पून मैदा भुरभुरवून घ्यावा. मैदा भुरभुरवून झाल्यावर केकचे भांडे उलटे करून त्यावर हाताने हलकेच मारुन घ्यावे जेणेकरून थोडासा मैदा तेलाला चिटकेल व जास्तीचा मैदा खाली पडेल. त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही.
२. केक तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे रुम टेम्परेचरला असले पाहिजेत. केकसाठी वापरले जाणारे घटक जास्त गरम किंवा जास्त थंड असतील तर ते नॉर्मल होऊन रुम टेम्परेचरला आल्यावरच वापरायला घ्यावेत.
३. केक तयार करण्यासाठी वापरले जाणारे बटर हे देखील मऊ स्वरुपातील असावे. एकदम कडक किंवा नुकतेच रेफ्रिजरेटर मधून काढलेले नसावे. बटर अगदीच वितळलेले गुळगुळीत किंवा एकदम कडक नसावे. बटरवर जर आपण आपले बोट ठेवून दाब दिल्यास आपल्या बोटाचा आकार त्यावर यावा इतक्या मऊ स्वरूपातील बटरचा वापर केक बनविण्यासाठी करावा.
४. मैद्यामध्ये प्रोटीन असते. ब्रेड बनवायचा असल्यास मैद्यातील प्रोटीनचे प्रमाण जास्त असणे गरजेचे असते. तसेच केक बनविण्यासाठी मैद्यातील प्रोटीनचे प्रमाण कमी लागते. केक बनवतात मैद्यातील प्रोटीनचे प्रमाण कमी करण्यासाठी, १ कप मैद्यात २ टेबलस्पून कॉर्न फ्लॉवर घालावे. हे मिश्रण एका बारीक जाळीच्या चाळणीत ३ वेळा व्यवस्थित चाळून घ्यावेत. अशाप्रकारे केक तयार करण्यासाठी आवश्यक असणारे केक फ्लॉवर तयार करता येऊ शकते.
५. सर्वसाधारणपणे केक तयार करण्यासाठी लागणारे कोरडे घटक जसे की, मैदा, मीठ व बेकिंग पावडर हे घटक एकत्रित करून तीन वेळा चाळून घ्यावेत. त्याचं कारण असं की, तीन वेळा चाळल्यामुळे सर्व घटकांचं मिश्रण एकजीव होतं आणि थोडी हवाही त्यात मिसळते. हे कोरडं मिश्रण केकमध्ये सर्वात शेवटी घालावे आणि त्यानंतर हे मिश्रण फार फेटू नये. हे मिश्रण जास्त वेळ फेटल्यास निर्माण झालेला वायू निघून जाण्याची शक्यता असते. जास्त ग्लुटेन होण्याचीही भीती असते कारण तसं झालं तर केक कडक होऊ शकतो. म्हणून कोरडे घटक सर्वात शेवटी हलक्या हातानं मिक्स करायचे असतात.
घरी केलेला केक विकतच्या केक सारखा फुलून येण्यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम पेजवरुन काही टिप्स शेअर केल्या आहेत, त्या समजून घेऊयात.
६. केक ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हनचं तपमान नीट सेट करावे. ओव्हनमध्ये केक ठेवण्यापूर्वी ओव्हन गरजेनुसार प्री - हिट करुन घ्यावा.
७. केकचं मिश्रण फार घट्ट झालं तर तो फुगत नाही. पातळ झालं तर सुरुवातीला फुगतो आणि मग खाली बसतो. केकच्या मिश्रणात चमचा पूर्ण बुडवून बाहेर काढून उलटा केल्यावर जर मिश्रण काही सेकंद चिकटून राहिलं आणि मग खाली पडलं तर ते योग्य आहे, असं समजावं.
८. केक झाला की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं स्वच्छ पातं केकच्या मध्याच्या जरा बाजूला केकमध्ये तळापर्यंत उभं घालावं व लगेच काढावं. जर स्वच्छ असेल तर केक झाला.सुरीला मिश्रण चिकटलं असेल तर केक आणखी थोडा वेळ भाजून घ्यावा.
९. साखर वापरताना मिक्सरमध्ये थोडी बारीक (पिठीसाखर नव्हे) करून घ्यावी म्हणजे ती लोण्यात लवकर विरघळेल. लोणी आणि साखर घुसळताना त्यात हवा मिसळून मिश्रण फुगलेलं दिसेपर्यंत, त्यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत घुसळावं.