Join us  

नारळ फोडण्याची ‘इतकी’ भन्नाट सोपी पद्धत! नारळ झटपट फोडून ५ मिनिटांत तयार नारळाची चटणी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 12:09 PM

How To Break Coconut and Make Delicious Coconut Chutney : काही वेळा आपली ही चटणी फार पातळ होते तर काही वेळा अगदी बेचव होते.

इडली, डोसा, मेदू वडा किंवा साऊथ इंडियन स्टाईल पदार्थ केले की आपण त्यासोबत सांबार आणि चटणी आवर्जून करतो. लुसलुशीत इडलीसोबत किंवा गरमागरम डोशासोबत ही खोबऱ्याची चटणी असली की आणखी काहीच लागत नाही. या चटणीसाठी नारळ हवाच, सोप्या पद्धतीने नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक पाहूया. म्हणजे चटणीचे काम आणखी सोपे होईल आणि चटणी तयार व्हायला फार वेळही लागणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच ही चटणी आवडीने खातात आणि मग त्यांचे पोट भरले की नकळत करणाऱ्यालाही आनंद होतो आणि त्याचे मन तृप्त होते. पण काही वेळा आपली ही चटणी फार पातळ होते तर काही वेळा अगदी बेचव होते. त्यामुळे संपूर्ण नाश्त्याची किंवा जेवणाची चव जाते. मात्र प्रत्येक घटक योग्य प्रमाणात घेऊन ही चटणी केल्यास ती अतिशय चविष्ट होते. पाहूयात घट्टसर आणि परफेक्ट चटणी करण्याची सोपी रेसिपी (How To Break Coconut and Make Delicious Coconut Chutney)...

नारळ फोडण्याची पद्धत

एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि नारळाच्या शेंड्या काढून ते नारळ या गरम पाण्यात ठेवायचे. पॅनवर झाकण ठेवून नारळ चक्क यामध्ये उकळायला ठेवायचे. १० ते १५ मिनीटे झाली की नारळाच्या करवंटीचा रंग काळसर झालेला दिसतो. गॅस बंद करुन हे नारळ गार होऊ द्यायचे आणि नंतर फोडले की करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येते. 

साहित्य - 

१. ओलं खोबरं - १ वाटी 

(Image : Google)

२. दाणे - अर्धी वाटी 

३. आलं - १ इंच 

४. हिरवी मिरची - २ 

५. कडीपत्ता - ८ ते १० पाने 

६. कोथिंबीर - अर्धी वाटी 

७. मीठ - चवीनुसार 

८. तेल - २ चमचे 

९. मोहरी, जीरं - १ चमचा 

१०. हरभरा डाळ - १ चमचा

११. उडीद डाळ - १ चमचा 

१२. लाल मिरची - २ ते ३ 

कृती - 

१. नारळाच्या ओल्या खोबऱ्याचे पातळ काप करुन घ्यायचे. हे काप आणि भाजलेले दाणे मिक्सरच्या भांड्यात घालायचे. 

२. यामध्ये हिरवी मिरची, कडीपत्ता, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि मीठ घालून थोडे फिरवून घ्यायचे. 

३. त्यानंतर यामध्ये अंदाजे पाणी घालून चटणी एकजीव फिरवायची. 

४. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालायचे आणि हरभरा डाळ आणि उडीद डाळ घालायची. 

५. मग मोहरी, जीरं घालून कडीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी तडतडू द्यायची. 

६. ही फोडणी तयार झालेल्या चटणीवर घालायची आणि गरमागरम डोसा किंवा इडलीसोबत ही चटणी खायची. आवडीनुसार यात थोडं दही किंवा लिंबू घालू शकतो, त्यानंतर अर्धा चमचा साखर घातली तरी छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.