काकडी. रोज सॅलेडमध्ये हवी, कोशिंबीर करायची तर काकडी हवी. नुस्तं चिरुन जेवताना घेतली ताटात तरी चालते. उपवासालाही चालते. काकडीचे सौंदर्यविषयक फायदेही अनेक आहेत. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात काकडी असतेच. मात्र बाजारात कोवळ्या बारक्या काकड्या नसल्या की जाड, मोठ्या काकड्याही घ्याव्या लागतात. मुळात काकडी कोणती चांगली? कशी आणावी आणि खाताना काय काळजी घ्यावी?
काकडय़ा विकत घेताना दोन्ही टोकांना गोलसर असलेल्या, टोकं सुरकुतलेली नसलेल्या, तजेलदार, पिवळ्या नसलेल्या घट्ट अशा बघून घ्याव्यात. काकडय़ा कधी-कधी कडू असू शकतात. त्यामुळे काकडी कोशिंबिरीसाठी चिरण्याआधी तिचा टोकाचा तुकडा काढून खाऊन पाहावा. दोन्ही टोकांचे तुकडे कडू नसतील तर ती चिरावीत. कधी कधी एक टोक कडू असतं आणि दुसरं टोक कडू नसतं. अशा वेळी कडू बाजूचा थोडा भाग काढून टाकावा आणि पुन्हा एक तुकडा खाऊन बघावा. कडू नाही लागला तर उरलेली काकडी चिरायला घेता येते. पण कडू लागला तर मात्र ती काकडी घेऊ नये.
(Image : Google)
बाजारातून काकडय़ा आणल्या की, त्या लगेच फ्रीजमधे ठेवाव्या लागतात. कारण बाहेर ठेवल्या तर त्यातील आद्र्रता झपाट्यानं कमी होऊन त्या कोमेजतात. खरंतर काकडय़ा विकत आणल्या की, शक्य तितक्या लवकर संपवाव्यात. काकडीची साल आणि बिया यात भरपूर पोषणमूल्यं असतात. सेंद्रिय शेतीच्या काकडय़ा सालासकट खाता येतात पण कृत्रिम खतं आणि जंतूनाशकं यांचा वापर करून पिकवलेल्या काकडय़ांच्या साली काढणं योग्य असतं.
काकडीच्या बिया अगदी बारीक असतात. कोशिंबिरीत आल्या तरी अडचण नसते.
(Image : Google)
काकडीत असलेल्या पॉलीफेनॉल्सच्या ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्मामुळे हदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. इतकंच नव्हे तर स्तनांच्या, गर्भाशयाच्या, गर्भाशयाच्या मुखाच्या आणि पोस्टेटच्या कर्करोगाला त्यामुळे प्रतिबंध होऊ शकतो. काकडीत भरपूर प्रमाणात के जीवनसत्त्व आणि काही प्रमाणात क जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. काकडी शक्यतो कच्ची खाल्ली तर जीवनसत्त्वांचा चांगला लाभ होतो.