पौष्टिक म्हणून आपण सफरचंद अगदी आवर्जून घरी आणतो. आपण तर खातोच, पण घरातल्या लहान मुलांनाही आवर्जून खायला घालतो. अगदी सहा महिन्यांच्या बाळालाही सफरचंद उकडून खायला घालतात. रोज एक सफरचंद खाल्लं तर ते आपल्याला डॉक्टरांपासून दूर ठेवतं, असं आपण नेहमीच ऐकतो. पण तेच सफरचंद आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी तर कारणीभूत ठरत नाही ना, हे एकदा तपासून पाहायला हवं. कारण जवळपास प्रत्येक सफरचंदावरच ते अधिक चमकदार दिसावं यासाठी मेणाचा थर दिलेला असतो (Simple solution to check wax coating on apple). आपण अगदी घरच्याघरी ही तपासणी करू शकतो. (How to check wax coating on apple in just 1 minute)
सफरचंदावर किती मेण आहे, हे कसं ओळखायचं?
सफरचंदावर मेणाचा कितपत थर आहे, हे अगदी एका मिनिटाच्या आत आपण घरच्याघरी तपासून पाहू शकतो.
यासाठी तुमच्या घरी असणारं कोणतंही एखादं सफरचंद घ्या.
फळं कापण्याची जी सुरी असते ती सुरी सफरचंदावर घासा. सुरी धारदार असावी. पण ती सफरचंदावर घासताना ते कापल्या जाणार नाही, एवढं मात्र पाहा.
जेव्हा तुम्ही धारदार सुरी सफरचंदावर घासाल, तेव्हा त्या सफरचंदावरून एक पांढरा थर निघू लागेल आणि तो सुरीवर साचत जाईल.
एखादा मिनिट हा प्रयोग केला तरी तुमच्याकडच्या सफरचंदाला किती मेण लावलेलं आहे, हे जाणून घेता येतं.
सफरचंद खाण्याची योग्य पद्धत कोणती?
थंड पाण्याने आपण कितीही वेळ सफरचंद धुतलं तरी त्यावरचं मेणाचं आवरण निघून जात नाही.
म्हणून मग सफरचंद गरम पाण्याने धुवून खा
किंवा मग त्याच्या साली काढून टाका आणि मग ते चिरून खा..