शहाळं म्हणजे एकप्रकारचे सलाईन असते. म्हणूनच आजारी व्यक्तीला किंवा गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांना आवर्जून शहाळं पाणी देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. शहाळं पाण्यात आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात, ज्यामुळे आपल्याला तरतरी येऊन अंगात ताकद येण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर शरीराला ओलावा मिळावा म्हणून आपण आवर्जून शहाळं पाणी पितो. घशाला कोऱड पडणे, डीहायड्रेशन, लघवीशी संबंधित समस्या शहाळं पाणी पिण्याने नियंत्रणात येऊ शकतात. शहाळं प्यायला गेलं की कधी त्यात पाणी कमी असतं तर कधी जे पाणी असतं ते म्हणावं तितकं गोड नसतं. आता आपण इतके पैसे देऊन शहाळं खरेदी करतो म्हटल्यावर त्यात भरपूर पाणी असायला हवं, ते पाणी गोड असायला हवं. म्हणून शहाळं खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं याविषयी समजून घेऊया (How To Choose Perfect Tender Coconut)...
१. वरचं साल तपासा
शहाळं खरेदी करताना त्याच्या वरच्या सालाचा रंग बघावा हा रंग पूर्ण हिरवट असेल असे पाहावे. मात्तर तो थोडा चॉकलेटी व्हायला लागला असेल तर हे शहाळं जुनं झालं व्हायला लागलं असं समजावं. त्यामुळे शहाळं घेताना या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं.
२. आकार बघा
शहाळ्याचा आकार नेमका कसा असावा असा प्रश्न आपल्याला पडतो. हे शहाळं पूर्ण गोल असावं की थोडं आडवं असेल तरी चालतं. नारळ झाडाला लागतं आणि त्याची वाढ होते तेव्हा ते गोलाकार असते. याचाच अर्थ त्यामध्ये भरपूर पाणी असते हे लक्षात ठेवावे. मात्र ते जसजसे आयताकृती व्हायला लागते तसा त्यामध्ये बदल होत जातो. अशावेळी या नारळातील पाणी आपोआप कमी व्हायला लागते हे लक्षात ठेवायला हवे.
३. हलवून पाहा
शहाळं हलवून पाहाणं ही शहाळ्याचा ताजेपणा तपासण्याची आणखी एक पद्धत आहे. यासाठी शहाळं कानापाशी धरुन हलवून पाहायला हवं. त्यात पाणी पूर्णपणे हलत असेल तर ते जुने व्हायला लागले हे समजावे. कारण ज्या शहाळ्यात जास्त प्रमाणात पाणी असते त्या शहाळ्यातून अजिबात आवाज येत नाही. अशावेळी ज्या शहाळ्यातून कमी आवाज येतो असे शहाळे खरेदी करावे.
४. वजन तपासा
ज्या शहाळ्यात जास्त प्रमाणात पाणी असते असे शहाळे वजनाला जड लागते. पण शहाळं जास्त हलकं लागत असेल तर त्यात पाण्याचे प्रमाण कमी आहे हे आपल्याला हातात घेऊनही लक्षात येते. म्हणून वजनाला जड असलेलं शहाळं खरेदी करायला हवं.
५. डाग पाहा
या गोष्टीकडे सामान्यपणे आपण लक्ष देत नाही. मात्र त्याकडे बारकाईने लक्ष दिलं तर आपली खरेदी सोपी होऊ शकते. शहाळ्याचा वरचा आणि खालचा भाग तपासा आणि त्यावर काळ्या रंगाचे डाग असतील तर या नारळातील पाणी खराब झालेले आहे हे ओळखायला हवे. तसेच या नारळाचा वास घेऊन पाहा. त्याला खराब वास येत असेल तर ते अजिबात खरेदी करु नका.