डिसेंबर म्हणजे नाताळचा महिना, या महिन्यात ठिकठिकाणी ख्रिसमसच्या निमित्ताने बाजारपेठा सजलेल्या असतात. केक, कुकीज, चॉकलेटस, गिफ्टस ही या महिन्याची खासियत. सांताक्लॉज लहान मुलांना रात्री येऊन या सगळ्या गोष्टी देऊन जातो अशी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकतो. याच ख्रिसमसच्या निमित्ताने केकलाही बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ख्रिश्चन धर्मीयांबरोबरच इतर लोकही नाताळचा हा सण उत्साहात साजरा करतात. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आवर्जून केक खाल्ला जातो. बाजारात मिळणारे केक महाग तर असतातच पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मैदा वापरलेला असल्याने आरोग्यासाठीही ते तितके चांगले नसतात. अशावेळी घरच्या घरी विकतसारखा लुसलुशीत रवा केक करता येतो. झटपट होणारा हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. कुकरमध्ये अगदी कमी वेळात आणि साहित्यात होणाऱ्या या केकची रेसिपी पाहूया (How To Cook Rava Cake At Home For Recipe for Christmas)...
साहित्य -
१. बारीक रवा - २ वाटी
२. ताजे दही - १ वाटी
३. पिठीसाखर - १ वाटी
४. दूध - १ वाटी
५. तूप - पाव वाटी
६. व्हॅनिला इसेन्स - अर्धा चमचा
७. ड्रायफ्रूट आणि टूटीफ्रूटी - आवडीनुसार
८. बेकिंग पावडर - १ चमचा
९. बेकिंग सोडा - १ चमचा
कृती -
१. एका बाऊलमध्ये तूप घालून त्यामध्ये साखर घालून ते दोन्ही चांगले एकजीव फेटून घ्यायचे.
२. यामध्ये रवा आणि दही घालून पुन्हा हे सगळे एकजीव करुन घ्यायचे.
३. मग यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून हे मिश्रण पुन्हा एकजीव करावे आणि झाकण ठेवून हे मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवावे.
४. कुकरमध्ये मीठ किंवा बेकिंग सोडा घालून त्यावर डीश ठेवून केकचे भांडे घालून कुकर १० मिनीटे प्री हीट करुन घ्यायचा.
५. बाजूला ठेवलेल्या मिश्रणात बेकींग सोडा आणि बेकींग पावडर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावे.
६. आवडीनुसार यामध्ये सुकामेवा आणि टूटीफ्रूटी घालावी.
७. कुकरच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालायचे.
८. गॅस सुरू करुन प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये ३५ ते ४० मिनीटे हे भांडे ठेवायचे.
९. केक बाहेर काढल्यावर १० ते १५ मिनीटे थंड झाल्यावरच तो कडेनी मोकळा करावा.