Join us  

नवरात्राच्या उपवासासाठी करुन ठेवा ४ गोष्टींची तयारी, उपवासाचा त्रास नाही- दगदगही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 3:14 PM

How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips : आधीपासूनच काही गोष्टींची तयारी करुन ठेवलेली असेल तर आपली दमणूक होत नाही.

नवरात्र म्हणजे देवीची आराधना, नऊ दिवसांचे उपवास, हळदी-कुंकू, भोंडला आणि बरंच काही. या दिवसांत आपण विविध रंगाचे कपडे घालून, छान सजून धजून देवीच्या दर्शनाला, देवीची ओटी भरायला जातो. इतकेच नाही तर देवीची आपल्यावर कृपादृष्टी राहावी यासाठी काही जण ९ दिवस अनवाणी राहतात तर काही जण एकदाच खाऊन कडक उपवास करतात. पण ९ दिवसांचे सलग उपवास करणारा प्रत्येक कुटुंबात १ जण तरी असतोच. उपवास म्हटल्यावर नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा वेगळा स्वयंपाक करणे ओघानेच आले. घरातील एका व्यक्तीचा उपवास असेल तरी तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी वेगळे काहीतरी करावेच लागते. त्यामुळे घरातील महिला वर्गावर ताण येतो. एकीकडे घरात घट बसणार असतील तर पुजेची आणि इतर तयारी आणि त्यात नेहमीच्या स्वयंपाकाबरोबरच उपवास असलेल्यांसाठी उपवासाचे वेगळे पदार्थ करायचे. त्यात ऑफीस आणि नेहमीच्या बाकी गोष्टी असतातच. अशावेळी महिलांची धांदल होऊ नये यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची तयारी करुन ठेवलेली असेल तर दमणूक होत नाही. पाहूयात यासाठी नेमकं काय करता येईल (How to do Preperation for Navratri Fasting Simple Tips).

१. उपवासाची फळं, राजगिरा, खजूर यांची खरेदी

फळं हा उपवास असणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम पर्याय असतो. त्याचप्रमाणे राजगिऱ्याचे लाडू, वड्या हे पदार्थ पटकन भूक लागली की तोंडात टाकण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय असतात. खजूर, सुकामेवा अशा पौष्टीक गोष्टीही आपण आणून ठेवू शकतो. याशिवाय उपवासाला चालणारा एखादा चिवडा किंवा चिप्स असे पदार्थ काही प्रमाणात घरात असतील तर एकाएकी भूक लागल्यावर हे खाता येऊ शकते. 

२. उपवासाच्या पदार्थांसाठी करायची तयारी

उपवास असताना साबुदाणा जास्त खाल्ला जात नाही. अशावेळी उपवासाच्या थालीपीठाची भाजणी, उपवासासाठी मिळणारी राजगिरा, शिंगाडा, वरई यांची पिठे आधीच दळून किंवा रेडीमेड आणून ठेवावीत. म्हणजे ऐनवेळी झटपट काही करायचे असेल तर ती वापरता येतात. याशिवाय काकडी, बटाटे, रताळी अशा किमान भाज्या घरात असतील तर जेवताना जोडीला पटकन देता येते. 

३. स्वयंपाकासाठी किमान तयारी

दाण्याचा कूट करुन ठेवणे, नारळ फोडून त्याचा चव काढून ठेवणे, मिरची-जिऱ्याचे वाटण करुन ठेवणे, दुधाचे दही लावून ठेवणे, शेंगादाण्याचे किंवा खजूराचे पौष्टीक लाडू करुन ठेवणे अशा लहान-मोठ्या गोष्टी तयार असल्या तर स्वयंपाक करताना लागणारा वेळही वाचू शकतो. त्यामुळे उपवासाचा पदार्थ कऱण्याचा वेगळा ताण येत नाही. या कामांची यादी केलेली असल्यास हातासरशी ही कामे करुन ठेवणे सोपे होते. 

(Image : Google )

४. डीहायड्रेशन होणार नाही यासाठी काय कराल? 

उपवासादरम्यान घेता येईल अशी काही सरबते, नारळ पाणी, उसाचा रस, ताक, बासुंदी किंवा रबडीसारखे गोडाचे पदार्थ यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवून वेळच्या वेळी आणाव्यात किंवा घरी कराव्यात. यामुळे शरीरातील साखर आणि मीठाचे प्रमाण चांगले राहून शरीरातील ताकद टिकून राहण्यास मदत होते. ऑक्टोबर हिट असल्याने या काळात शरीराला द्रव पदार्थांचा जास्त आवश्यकता असते. अशा काळात उपवास असताना चहा किंवा कॉफी यांसारखी पेये जास्त घेतल्यास उष्णता, अॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नवरात्री