दिवाळी म्हटल्यावर गोडधोड खाणं तर होणारच. वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने फराळाचे पदार्थ, एकमेकांना भेटणे, मिठाई गिफ्ट म्हणून देणे या सगळ्यामध्ये आपलेही नकळत बरेच गोड खाणे होते. डायबिटीस असणाऱ्यांना गोड खाण्यावर आधीच बंधने असतात. त्यातही गोड खाल्ल्याने लठ्ठपणा किंवा इतर समस्यांमध्ये वाढ होत असल्याने गोड पदार्थ काहीसे बदनाम असतात. पण गोड पदार्थ हा अनेकांसाठी विक पॉईंट असल्याने गोड खाल्ल्यावर मिळणारा आनंद फारच जास्त असतो. त्यामुळे जेवणात किंवा मधल्या वेळेलाही तोंडात टाकायला आपल्याला गोड काही ना काही लागतेच. अशावेळी दिवाळीच्या दिवसांत आनंदाने पण काही गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन मिठाई खायला हवी (How To Eat and Not Eat Mithai In Diwali Tips By Rujuta Divekar).
दिवाळीच्या निमित्ताने तुम्हीही गोड खात असाल तर काही किमान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर आपल्या फॉलोअर्सना गोड खाण्यासंबंधातील काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ऋजूता यांचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स असून त्या सातत्याने या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सना आरोग्याच्या बाबतीत जागरुक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या पोस्टना नेटीझन्स मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही देतात. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या गोड खाण्याविषयीच्या पोस्टमध्ये त्या मिठाई खाताना काय करावे आणि काय करु नये याविषयी अतिशय महत्त्वाच्या टिप्स सोप्या पद्धतीने आपल्याला सांगतात. त्यामुळे तुम्हाला दिवाळीत मिठाई खायची असेल तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या म्हणजे या सणाचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकाल.
मिठाई कशी खायला हवी ?
१. हक्काने
२. घरात तयार करुन
३. सगळ्यांमध्ये वाटून
४. एकावेळी एकच खावी
५. आरामात खावी
६. आनंदाने खावी.
मिठाई कशी खाऊ नये ?
१. दोषी किंवा अपराधी भावनेने खाऊ नका.
२. गिफ्टींग हँपरमधली मिठाई खाऊ नका.
३. एकटे, कोणाच्या नजरा चुकवून मिठाई खाऊ नका.
४. पूर्ण बॉक्स एकाचवेळी संपवू नका.
५. घाईघाईत मिठाई खाणे योग्य नाही.
६. ताण घेऊन, डीटॉक्सचा विचार करत मिठाई खाण्यात मजा नाही.