नूडल्स तर खूप जास्त आवडतात, पण मोठमोठाल्या, हायफाय हॉटेलमध्ये जाऊन चॉपस्टिकने (How to eat with chopstick) नूडल्स खायचं म्हटलं की जाम नकोसं होतं.. सर्वांसमोर उगीच लाजिरवाणी वेळ स्वत:वर ओढवून घ्यायला नको, म्हणून मग आपण नूडल्स खाण्याची जबरदस्त इच्छा असूनही चक्की नूडल्सला नाही म्हणतो... त्याच वेळी नेमकं आपल्या आजूबाजूचे लोक कसे दोन बोटात चॉपस्टिक धरून अगदी झकासपैकी नूडल्स खात आहेत, हे पाहून त्याचं कौतूकही वाटतं... खरं तर त्यात काहीच अवघड नसतं.. फक्त काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं.. म्हणूनच तर बघा हा व्हिडिओ...
हा व्हिडिओ मास्टर शेफ पंकज भादुरिया यांनी त्यांच्या MasterChef Pankaj Bhadouria या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ छोटाच आहे, पण खूप उपयुक्त आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच असं लक्षात येतं की अरेच्चा, हे तर किती सोपं होतं आणि आपण उगाच याला घाबरत होतो.. म्हणूनच त्यांनी दिलेल्या टिप्स व्यवस्थित लक्षात घ्या आणि आजच चॉपस्टिकने नूडल्स किंवा इतर चायनिज पदार्थ खाण्याचा प्रयोग करून बघा..
चॉपस्टिक कसं पकडायचं..(how to hold chopstick perfectly)
१. चॉपस्टिक कधीही खालच्या बाजूने पकडायचं नाही. ते नेहमी वरच्या बाजूने पकडा.
२. तुमच्या उजव्या हाताचा अंगठा आणि पहिले बोट यांच्यात जी जागा आहे त्यामध्ये एक चॉपस्टिक ठेवा.
अंगठा आणि पहिले बोट जवळ करून चॉपस्टिक त्यात एकदम फिट बसली पाहिजे, याकडे लक्ष द्या.
३. या चॉपस्टिकला करंगळीच्या बाजूच्या बोटाने आधार द्या. ही झाली तुमची खालच्या बाजूची चॉपस्टिक.
४. आता दुसरी वरच्या बाजूची चॉपस्टिक पकडण्यासाठी पहिले बोट, अंगठा आणि मधले बोट यांचा वापर करायचा आहे. पहिले बोट आणि मधले बोट यांच्यामध्ये चॉपस्टिक पकडा. तिला अंगठ्याने आधार देण्याचा प्रयत्न करा.
५. चॉपस्टिक अशा पद्धतीने पकडल्यानंतर तुम्ही त्या जेव्हा तुमच्या प्लेटमध्ये टेकवाल, तेव्हा त्या दोघांचीही टोके प्लेटमध्ये एकसारखी टेकली पाहिजेत. एक वर, एक खाली अशा पद्धतीने नको.
६. आता बोटांची हालचाल करून वरची चॉपस्टिक मागे आणण्याचा प्रयत्न करा आणि त्यात नूडल्स किंवा इतर पदार्थ पकडा. हे करताना शक्यतो खालच्या बाजूला असलेली चॉपस्टिक हलवू नका. ती फर्म ठेवा.
७. थोडीशी प्रॅक्टीस केली तर चॉपस्टिकने खाणं अजिबातच अवघड नाही, हे तुमचं तुम्हालाच जाणवू लागेल.