भात हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ रोजच्या जेवणात आपण साधा भात करतो आणि काही वेळा रात्रीच्या जेवणासाठी किंवा विकेंडला खिचडी, पुलाव, मसालेभात असे भाताचे काही ना काही प्रकारही करतो. एकावेळी अनेक गोष्टींची गडबड असली की आपण दोन हातांनी बरीच कामे करत असतो. घाईच्या वेळी आपण डायरेक्ट कुकरमध्ये हा भात लावतो किंवा कधी कढईत किंवा पातेल्यात भात करतो. भात शिजत असताना बाजूला आपण इतर कामे करतो. पण अशावेळी भाताकडे लक्ष द्यायचं राहीलं तर तो पटकन खाली लागतो (How To Get Rid of The Burnt Smell from Rice).
मग जळालेल्या भाताचा करपट वास यायला लागतो आणि मग आपल्याला गॅसवर भात ठेवल्याची आठवण होते. अशावेळी कितीही धावत येऊन गॅस बंद केला तरी एकदा भात खालच्या बाजूने करपला की त्याला काहीच करता येत नाही. मग या करपलेल्या भाताचा वास वरच्या भाताला लागतो. पण वरचा न करपलेला भात आपण वासापासून दूर ठेवू शकतो. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यासाठीच १ सोपी ट्रिक शेअर करतात. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि त्यामुळे भाताचा वास जाण्यास कशी मदत होते.
काय आहे उपाय?
भात करपला आहे म्हणून तो पूर्ण टाकून देणं परवडणारं नसतं. पण करपट किंवा जळका वास लागलेला भात खाणंही शक्य नसतं. त्याशिवाय पाहुणे आले असतील आणि आपल्या हातात वेळ कमी असेल तर या भाताचं वेळीच काहीतरी करणं भाग असतं. अशावेळी वरच्या भाताला लागलेला वास घालवण्याचा सोपा उपाय पाहूया. एक कांदा घेऊन तो सालासकट धुवून घ्यावा. त्याचे सालासहीतच ४ भाग करावेत आणि भातावरचे झाकण काढून हे ४ भाग भाताच्या मध्यभागी घालून पुन्हा त्यावर झाकण ठेवून द्यावे.
साधारण १० मिनीटे या चिरलेल्या कांद्याचा फोडी भातात ठेवल्यानंतर झाकण उघडून कांद्याच्या फोडी बाजूला कराव्यात. त्यानंतर भात एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावा. यामुळे भाताचा करपट वास तर जातोच पण त्याला कांद्याचाही वास लागत नाही. कांद्यामध्ये असलेल्या उग्र वासामुळे करपट वास निघून जाण्यास मदत होते.