बहुतांश भारतीय पदार्थांमध्ये नारळाचा वापर हा मोठ्या प्रमाणांत केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये साधारणपणे समुद्र किनारपट्टीपासून जवळ राहणाऱ्या प्रद्रेशात स्वयंपाकात नारळ वापरण्याची पद्धत असते. केरळ, गोवा, कोकणात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या घट्टसर ग्रेव्ही तयार करण्यासाठी नारळाच्या वाटपाचा वापर केला जातो. पोहे, उपमा, पुलाव भात यांसारख्या पदार्थांवर किसलेलं खोबर घालून हे पदार्थ खाल्ले जातात. सणासुदीच्या दिवशी मोदक, नारळाच्या करंज्या असे काही खास गोडाधोडाचे पदार्थ करायचे असल्यास नारळाचा वापर केला जातो.
पदार्थांमध्ये खवलेला नारळ घातला की ते पदार्थ आणखीनच रुचकर लागतात. असे असले तरीही नारळ विकत आणणे तो फोडणे आणि किसणे हे मेहनतीचे काम असते. यामुळेच काहीजणांना, नारळ किसणे हे काम फारच कंटाळवाणे आणि वेळखाऊ वाटते. ओल्या नारळामध्ये पाण्याचा अंश मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे जर नारळाचा किस किंवा फोडलेला नारळ फ्रिज बाहेर ठेवला तर तो कुजण्याची तसेच त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. नारळ ओलसर असल्यामुळे तो एकदा फोडला की बाहेरील वातावरणात जास्त काळ टिकत नाही. नारळ टिकवण्यासाठी तो उन्हात सुकवून सुके खोबरे वापरले जाते. मात्र ओला नारळ टिकवण्यासाठी आपल्याला फ्रिजचाच वापर करावाच लागतो. काहीवेळा कामाच्या गडबडीत नारळ खवण्याइतपत वेळ नसतो, किंवा काहीवेळा नारळ फोडून अर्धा नारळ वापरून उरलेला नारळ तसाच ठेवल्यास खराब होतो. अशावेळी नेमकं काय करायचं असा प्रश्न पडून गृहिणींचा गोंधळ उडतो. यासाठी तुम्ही एक साधी सोपी ट्रिक वापरुन खवलेला नारळ दीर्घकाळ स्टोअर करुन ठेवू शकता(How To Grate A Coconut Quick & Easy, Freezing Fresh Grated Coconut).
किसलेलं खोबर स्टोअर करुन ठेवण्याची सोपी ट्रिक :-
१. सर्वप्रथम नारळाची शेंडी कापून घ्यावी. त्यानंतर नारळांवरील अतिरिक्त केस काढून घ्यावेत.
२. मग स्वच्छ करुन घेतलेला नारळ फोडून घ्यावा. नारळ फोडताना त्याखाली एक भांडे ठेवावे, जेणेकरुन नारळाचे पाणी त्यात पडेल.
३. नारळातून पाणी काढून घेतल्यानंतर त्या नारळाचे दोन भागांत विभाजन करुन घ्यावे. आता या नारळाच्या वाट्या २४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्याव्यात.
४. एक मोठे भांडे घेऊन त्यात नारळाच्या सगळ्या वाट्या संपूर्ण भिजतील इतके पाणी उकळवून घ्यावे.
कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...
५. आता २४ तासांनंतर नारळाच्या फ्रिजमध्ये ठेवलेल्या वाट्या काढून घ्याव्यात. या वाट्या गरम उकळत्या पाण्यांत सोडाव्यात.
६. ५ ते १० मिनिटे या वाट्या उकळत्या पाण्यांत ठेवल्यानंतर बाहेर काढून घ्याव्यात.
टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...
७. त्यानंतर जाड सूरी किंवा चाकू घेऊन करवंटीच्या आतील नारळाचा पांढरा भाग काढून घ्यावा.
८. नारळाचा पांढरा भाग संपूर्ण वाटीच्या आकारात गोलाकार काढून झाल्यानंतर त्याला करवंटीचा काही भाग चिकटून राहिला असल्यास नारळ अलगद सोलकाढण्याने सोलून घ्यावा.
९. आता या संपूर्ण पांढऱ्याशुभ्र नारळाच्या वाटीचे सुरीने मध्यम आकारचे तुकडे करुन घ्यावेत.
१०. नारळाचे मध्यम आकाराचे तुकडे मिक्सरला लावून त्याचा किस होईपर्यंत वाटून घ्यावे.
११. मिक्सरमध्ये खवून घेतलेला नारळ एका हवाबंद डब्यांत भरुन ठेवावा.
अशाप्रकारे आपण नारळ एकदाच खवून ३ ते ४ आठवडे हवाबंद डब्यांत स्टोअर करुन रेफ्रिजरेट केल्यास नारळाचा किस दीर्घकाळ टिकतो, व आपल्याला हवा तेव्हा वापरता येतो.
नारळाचा किस जास्त काळ टिकवण्यासाठी इतर टिप्स :-
१. नारळाचा किस जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी नारळ खरेदी करताना तो फ्रेश असेल याची खात्री करून मगच नारळ विकत घ्यावा.
२. नारळ फोडल्यावर तो किसून घ्या किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि झिप लॉक बॅगमध्ये भरुन रेफ्रिजरेट करा.
३. झिप लॉक बॅग सिल पॅक असतील आणि त्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्या.
४. दररोज नारळाचा वापर करायचा असेल तर छोट्या छोट्या बॅगचा वापर करा ज्यामुळे एकदा बॅग फ्रिजमधून काढली की एकाच वेळी तुम्हाला त्यातील नारळाचा किस वापरता येईल.
५. जर तुम्हाला नारळपाणी जास्त काळ टिकवायचे असल्यास, त्याच्या आईस क्युब्स करून तुम्ही ते फ्रिजरमध्ये साठवून ठेवू शकता.